Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत प्रेक्षकांना एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच काव्या गरोदर असल्याची गुडन्यूज देशमुखांना मिळाली आहे. पार्थ आणि काव्या आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येताच सगळेजण आनंदी होतात. पण, आता लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे.
मालिका सुरू झाल्यापासून आपण पाहतोय काव्या IAS होण्यासाठी तयारी करत असते. या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा काव्या उत्तीर्ण झालेली आहे. मध्यंतरीच्या काळात पार्थ-काव्यामध्ये गैरसमज निर्माण झाले होते यामुळे तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं. पण, आता पार्थबरोबर पुन्हा एकदा स्वमर्जीने लग्न केल्यावर काव्याने अभ्यासाकडे लक्ष द्यायचं असं ठरवलेलं आहे.
मात्र, काव्याच्या नशिबात आता एक नवीन वळण येणार आहे. अभ्यासावर, करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं की आई होण्याचा विचार करायचा अशा दोन गोष्टींमध्ये काव्या अडकणार आहे. ती लवकरच पार्थसमोर आपलं मन मोकळं करेल. यावेळी काव्याला अश्रू अनावर होत असल्याचं पाहायला मिळतंय.
काव्या पार्थला म्हणते, “पार्थ मला मनापासून आई व्हायचंय…पण, मी खरंच तयार आहे की नाही मलाच कळत नाहीये. एकीकडे माझा अभ्यास आणि दुसरीकडे बाळ मी कसं हे सगळं मॅनेज करू? आई होणं खूप मोठी जबाबदारी आहे पार्थ”
यावेळी पार्थ बायकोला धीर देत म्हणतो, “मी तुमच्याबरोबर आहे ना…तुमच्या मनात जर आई होण्याबद्दल शंका असेल तर…” पुढे काव्या त्याला विचारते, “तर काय?” आणि इथेच हा प्रोमो संपतो. आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पुढे काय घडणार हे २ एप्रिलच्या विशेष भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, प्रेक्षकांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्त आहे हा प्रोमो…काव्याला बाळही हवंय आणि करिअर सुद्धा ती फक्त थोडी कन्फ्युज आहे”, “हा चांगला ट्रॅक आहे आताच्या पिढीला अनुसरून ही गोष्ट सांगा”, “काव्याकडून दोन्ही गोष्टी मॅनेज होतील नक्की”, “आजच्या काळाच्या रिॲलिटीवर आधारित आहे हा ट्रॅक म्हणजे जिथे करिअर आणि बाळ या दोन जबाबदारी आहेत…लेखकांचं कौतुक”, “सध्याची परिस्थिती उत्तम दाखवली आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
