Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. पार्थ-नंदिनीचं एकमेकांशी अरेंज मॅरेज ठरलेलं असतं. मात्र, खलनायिकांच्या कारस्थानामुळे ऐन लग्नाच्या दिवशी नंदिनीला किडनॅप केलं जातं. यामुळे गावातले लोक बळजबरीने नंदिनीच्या धाकट्या बहिणीचं म्हणजेच काव्याचं आणि पार्थचं लग्न लावून देतात.
काव्या-पार्थचा लग्नसोहळा पार पडत असताना जीवा-नंदिनी लग्नमंडपात पोहोचतात. नंदिनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगते आणि त्यानंतर तिच्यावर सुद्धा लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो. यानंतर भर मांडवात जीवा तिचा स्वीकार करतो आणि अखेरिस जीवा-नंदिनी विवाहबंधनात अडकतात. जीवा आणि काव्या आधीपासूनचं एकमेकांना डेट करत असतात. त्यामुळे जीवाला आपल्या मोठ्या बहिणीचा नवरा म्हणून पाहणं काव्याला सहन होत नसतं.
एकीकडे काव्या पार्थबरोबर मनाविरुद्ध झालेल्या लग्नाचा तिरस्कार करत असते. तर, दुसरीकडे नंदिनी आई-बाबांच्या सुखासाठी जीवाबरोबर झालेलं लग्न निभावण्याचा निर्णय घेते. काव्या माहेरी आलेली असताना सगळेजण तिची समजूत काढत असतात. कारण, तिच्या आणि जीवाच्या अफेअरबद्दल कोणालाच माहिती नसतं…अगदी नंदिनीला सुद्धा नाही.
काव्याची आई तिला सासरी जाण्यासाठी विनंती करत असते. पण, काव्या काही केल्या ऐकून घेण्यास तयार नसते. सासरी जाण्यास ती स्पष्ट नकार देते. यानंतर तिची आई लेकीची समजूत काढून सासरी जा असं तिला सांगते आणि तिची बॅग भरायला घेते. एवढ्यात काव्याच्या कपाटातून एक लॉकेट जमिनीवर पडलं. या हृदयाच्या आकाराच्या लॉकेटमध्ये एका बाजूला नंदिनीचा फोटो असतो, तर दुसऱ्या बाजूला जीवाचा फोटो असतो. हे लॉकेट काव्याची आई पाहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो.
यानंतर काव्या आईसमोर जीवावर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे. काव्याचा खुलासा ऐकून तिची आई चांगलीच चक्रावून जाते. आता प्रत्यक्षात नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे यातून हे चौघंजण मिळून कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईल प्रेम’ या मालिकेचा हा विशेष भाग येत्या १७ मार्चला प्रसारित करण्यात येणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित केली जाते.