Lagnanantar Hoilach Prem Marathi Serial Time Changes : स्टार प्रवाहने नुकतीच ‘विसरू नको तू मला’ या नव्या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख जाहीर केली आहे. ही नवीन मालिका सायंकाळी सात वाजता प्रसारित केली जाणार आहे. या स्लॉटला सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. आता सात वाजता नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर मृणाल-ज्ञानदाच्या मालिकेचं काय होणार? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. अनेकांनी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका संपणार का? असेही प्रश्न कमेंट्समध्ये उपस्थित केले होते. अखेर याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका संपणार नसून येत्या २९ जूनपासून ही जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याची गोष्ट एका नव्या वेळेत पाहायला मिळेल. ही मालिका दुपारच्या सत्रात शिफ्ट करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या टीआरपीमध्ये प्रचंड घसरण झाली होती. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत टॉप-१० मध्येही नाहीये. यामुळेच आता सात वाजता नवीन मालिका प्रसारित केली जाईल आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलली गेली आहे.

स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनीच्या जोडीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. प्रत्येक वळणावर नव्या आव्हानांना सामोरं जात असतानाही या पात्रांनी नात्यांवरचा विश्वास आणि प्रेमाची ताकद कायम ठेवली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने या मालिकेला उचलून धरलं. मालिकेचा यापुढील प्रवास अधिक उत्कंठावर्धक आणि रंजक होणार आहे. २९ जूनपासून दुपारी १ वाजता ही मालिका ऑन एअर करण्यात येईल.

दुपारी १ वाजता एका नव्या वेळेत ही मालिका तितक्याच उत्साहाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’वर दुपारी एक वाजता ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही समृद्धी केळकरची मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळे आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची वेळ बदलल्यावर ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिका संपण्याची दाट शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत अद्याप वाहिनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नेमकी कोणती मालिका संपणार हे लवकरच स्पष्ट केलं जाईल.