Marathi Actor Vijay Andalkar Personal Life: ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही महाराष्ट्राची महामालिका ठरली. तर, सर्वोत्कृष्ट जोडी हा पुरस्कार पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनीला देण्यात आला. या सर्वोत्कृष्ट जोडीपैकी एक म्हणजेच पार्थ व काव्याची भांडणं, रुसवे-फुगवे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. मालिकेत हुशार आर्किटेक्ट असलेला पार्थ काव्याच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतो. पण पार्थ ही भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरच्या खऱ्या आयुष्यातील काव्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?

विजय आंदळकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. त्याने ढोल ताशा, अनुराधा, शिमगा, घंटा, हवाहवाई, बाजीराव मस्तानी, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, ७०२ दीक्षित, पिंकीचा विजय असो, लग्नानंतरची वाईफ वेडिंगची बायकू अशा गाजलेल्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

विजय आंदळकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याच्या पत्नी व लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. बऱ्याच जणांना माहित नाही, पण विजयचं हे दुसरं लग्न आहे. विजयची पहिली बायकोही मराठी अभिनेत्रीच होती, एकाच मालिकेत काम करताना ते प्रेमात पडले होते, त्यांनी लग्न केलं, पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

विजय आंदळकरची पहिली बायको कोण होती?

विजय आंदळकरचे पहिले लग्न अभिनेत्री पूजा पुरंदरेशी झाले होते. पूजाने ‘किती सांगायचंय मला’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर काही काळाने विजय व पूजाचे मतभेद होऊ लागले, त्यानंतर परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जातं.

विजय आंदळकरने लोकप्रिय अभिनेत्रीशी केलं दुसरं लग्न

घटस्फोटानंतर विजयने रुपाली झनकर हिच्याशी दुसरे लग्न केलं. या दोघांची ओळख ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ या मालिकेच्या सेटवर झाली होती, ज्यात रुपालीने ‘काजोल’ ही भूमिका साकारली होती. या जोडीने मे २०२१ मध्ये साखरपुडा केला आणि त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले. २०२३ मध्ये त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव त्यांनी ‘मायरा’ ठेवलंय.

विजय आंदळकर व रुपाली झनकर लव्ह स्टोरी

विजय आंदळकर व रुपाली झनकर यांच्यात तब्बल १२ वर्षांचे अंतर आहे. एकाच मालिकेत काम करताना रुपालीला विजय आवडू लागला. त्या मालिकेचे निर्माते रुपालीचे काका होते, त्यांनी विजयला तंबीही दिली होती. पण रुपाली त्याच्या प्रेमात असल्याचं त्याला माहित होतं. नंतर विजयला त्याच्या आईने रुपालीला लग्नासाठी मागणी घालायला सांगितलं. अशा रितीने त्यांचं लग्न झालं.

विजय आंदळकरबद्दल बोलायचं झाल्यास तो अभिनेता असण्याबरोबरच वकीलदेखील आहे.