Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत आता पार्थ-काव्यामध्ये छान मैत्री झाल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला मिस्टर देशमुखांचा तिरस्कार करणारी काव्या आता नवऱ्यावर मनापासून प्रेम करू लागलीये. मात्र, तिने आपल्या मनातील भावना अद्याप पार्थसमोर व्यक्त केलेल्या नाहीत.

मानिनीने सुद्धा काव्याचा भूतकाळ विसरून आता तिचा स्वीकार केला आहे. आता काव्या आणि पार्थ एकमेकांसमोर त्यांच्या मनातील प्रेम केव्हा व्यक्त करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काव्या व पार्थ यांना प्रेमाने त्यांचे चाहते ‘काव्यार्थ’ म्हणतात. सोशल मीडियावर काव्यार्थच्या चाहत्यांचे अनेक फॅनपेजेस सुद्धा सक्रिय आहेत. आता या सगळ्या चाहत्यांची एक आनंदाची बातमी आहे.

पार्थ लग्नानंतर आपल्या बायकोसाठी म्हणजेच काव्यासाठी एक दागिना खरेदी करणार आहे. आता हा दागिना काय असावा असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे तो मानिनीशी याबद्दल चर्चा करतो. लग्न मनाविरुद्ध झालं होतं…त्यामुळे आता नात्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहताना तू काव्यासाठी मंगळसूत्र कर असा सल्ला मानिनी लेकाला देते. पार्थला सुद्धा आईचं म्हणणं पटतं. पण, त्याला मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये काहीतरी स्पेशल हवं असतं.

पार्थ मंगळसूत्राच्या डिझाइनबद्दल विचार करत असतो इतक्यात काव्या कॉफी घेऊन येते आणि तिचा पाय सरकतो. पार्थ तिला वेळीच सावरतो पण, तिच्या हातातली कॉफी निसटून एका कागदावर सांडते. या कागदावर लिहिलेलं असतं काव्यार्थ. इथेच पार्थला त्यांच्या नात्याची पहिली निशाणी म्हणून मंगळसूत्रात कोणती डिझाइन पाहिजे याची हिंट मिळते.

आता पार्थ काव्यासाठी ‘काव्यार्थ’ नाव कोरलेलं खास मंगळसूत्र बनवून घेणार आहे. हा रोमँटिक प्रोमो पाहून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचे प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले आहेत.

एकीकडे पार्थ-काव्याची गाडी रुळावर येतेय. तर, दुसरीकडे जीवा-नंदिनीच्या आयुष्यात अनेक चढउतार सध्या सुरू आहेत. भास्करने फसवणूक केल्यामुळे जीवाला आजीचे दागिने आणि वडिलांची जमीन विकावी लागते. यामुळे सगळे त्याच्यावर प्रचंड नाराज आहेत. आता या सगळ्यात नंदिनी जीवाला कशी सावरणार आणि पार्थने दिलेलं मंगळसूत्र काव्याला आवडेल का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.