‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. येत्या १६ डिसेंबरला संपूर्ण देशमुख कुटुंबीयांसमोर जीवा आणि काव्याचं लग्नाआधीचं नातं उघड होणार आहे. आता यामुळे जीवा-नंदिनी तसेच पार्थ-काव्याच्या नात्यात कायमचा दुरावा येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वसु आत्या आणि रम्याकडे जीवा-काव्याविरोधात पुरावा देखील असतो.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या आणि रम्या या दोघी कायम एकमेकींशी वाद घालताना दिसतात. काव्या ही पार्थची बायको असते, तर रम्याला बालपणापासून पार्थ आवडत असतो. त्यामुळे मालिकेत रम्या आणि काव्या या दोघींची कायम भांडणं होतात. पण, प्रत्यक्षात असं काहीच नाहीये. ऑफस्क्रीन या दोघींमध्ये खूपच छान मैत्री आहे. या दोघींचा व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्याची भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर साकारत आहे. तर, अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी या मालिकेत रम्याच्या भूमिकेत झळकत आहे. एक मालिकेची नायिका आहे तर, दुसरी खलनायिका आहे. पण, ऑफस्क्रीन दोघींमध्ये छान मैत्री असून त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘Bayilone Ballipalike’ हे तेलुगू गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं गायिका मंगलीने गायलं आहे. या गाण्यात एक खास हूकस्टेप आहे. यावर सध्या सगळे इन्फ्लुएन्सर जबरदस्त डान्स व्हिडीओ बनवून थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील रम्या-काव्याने सुद्धा याच गाण्यावर ठेका धरला आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अनपेक्षित कोलॅब”, “काव्या आणि रम्या एकत्र…हा तर चमत्कार झाला”, “संपला विषय… या दोघींचा एकत्र डान्स भारीच”, “आता खरा ट्रेंड पूर्ण झाला”, “दोघी खूप छान नाचल्या” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी ज्ञानदाने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओवर केल्या आहेत.