सध्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ सोहळ्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता हा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील कलाकारांचा जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहे. तसंच महाराष्ट्र भूषण, पद्मश्री विजेते अशोक सराफ यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’मधील प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सोहळ्यातील रेड कार्पेटवर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील कलाकारांनी हटके लूक केला होता; ज्याची चर्चा सुरू असून अनेकांनी ट्रोल केलं आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील कलाकार रेड कार्पेटवर गुलाबी रंगाच्या पेहरावात पाहायला मिळाले. यावेळी मालिकेतील सगळ्या कलाकारांनी मुंडावळ्या बांधल्या होत्या. जे पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. “हा काय प्रकार आहे?”, “काय मुर्खपणा आहे…फॅशनच्या नावाखाली काहीपण करायचं”, “येड्याची जत्रा”, “असेल पीआर स्टंट करू नका”, “विनाश काले विपरीत बुद्धी”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “काहीपण हां…मालिकेच्या नावात लग्न शब्द आहे म्हणून काय सगळ्यांनाच मुंडावळ्या द्यायच्या का? पांचटपणा नुसता.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे काय? सगळे मुंडावळ्या बांधून, निदान त्या छोट्या मुलीला सोडलं असतं. अतिशयोक्तीची पराकाष्ठा केली राव.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “शुद्ध बावळटपणा…सगळे मुंडावळ्या बांधून काय करतायत….परत जातायत वाटतं त्या गावात स्वतःचं लग्न लावायला.” अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. पण, सगळ्या कलाकारांनी मुंडावळ्या बांधण्याची ही कल्पना कोणाची होती? हे समोर आलं आहे.

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने रेड कार्पेटवर सगळ्यांनी मुंडावळ्या बांधायची कल्पना सुचवली. ‘अल्ट्रा बझ मराठी’शी संवाद साधताना ज्ञानदा म्हणाली, “आमच्या मालिकेचं नाव आहे ‘लग्नानंतर होईलचं प्रेम’…त्यामुळे आमची मालिका आणि साधारण सगळ्यांना लग्न करा रे बाबा, असं आम्ही प्रमोट करतोय.” त्यानंतर रम्या म्हणजे अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी म्हणाली की, मालिकेच्या नावाप्रमाणे गुलाबी रंग प्रेमाचं प्रतिक ऑलरेडी मिळाला होता. त्यामुळे लग्नाचं प्रतीक म्हणून आम्ही सगळ्यांची मुंडावळ्या घातल्या. पुढे ज्ञानदा लूकच्या तयारीबाबत सांगताना म्हणाली की, गेल्या काही दिवसांपासून मालिकेत लग्नाचा सिक्वेन्स सुरू होता. या सिक्वेन्समधून रम्या लवकर फ्री झाली. रम्याने सगळ्यांसाठी मुंडावळ्या आणल्या आणि घातल्या.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋतुजा देशमुख, अनुष्का पिंपुटकर असे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.

Story img Loader