Mrunal Dusanis Love Letter Story : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे, मृणाल दुसानिस. आपल्या सहज सुंदर अभिनयाने कायमच ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. मालिकेत तिची आणि जीवाची जोडी लोकप्रिय आहे.
अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मृणालने २०१६ मध्ये नीरजबरोबर लग्न केले, दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. मृणाल-नीरजचे अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न झालेले असले तरी त्यांची लग्नाआधीची स्टोरी ही एखाद्या लव्हस्टोरीपेक्षाही कमी नाही. दोघे लग्नाआधी एकमेकांना चिठ्ठी लिहायचे. याच चिठ्ठीचा एक मजेशीर किस्सा तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता.
एका मुलाखतीत मृणालने तिच्या आणि नीरजच्या चिठ्ठीचा मजेशीर किस्सा शेअर केला होता. खरंतर, या चिठ्ठीमुळेच दोघांचे सूर जुळले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेमका काय आहे मजेशीर किस्सा? चला जाणून घेऊ…
अनुरूप विवाहसंस्था या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मृणाल-नीरज यांना ‘एकमेकांना कधी पत्र लिहिलं होतं का?’ असं विचारलेलं. यावर नीरज म्हणालेला, “पत्र असं नाही… पण आम्ही एकमेकांबद्दल दोन ओळी लिहून, त्याचे फोटो मोबाईलद्वारे पाठवले होते.” यानंतर मृणाल म्हणाली होती, “आम्हाला एकमेकांचं अक्षरं बघायचं होतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं? हे आम्ही एका कागदावर लिहून त्याचे फोटो एकमेकांना पाठवले.”
“एकदा मी बाबांचा शर्ट घातला होता. मी घरात बाबा किंवा भावाचे कपडे घालते. त्यामुळे सवयीप्रमाणे मी बाबांचा शर्ट घालून नीरजला पाठवण्यासाठी चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी त्या शर्टच्या खिशात ठेवली. नंतर कुठेतरी जायचं, म्हणून बाबांनी तो शर्ट घातला; तर त्यांना ती चिठ्ठी मिळाली आणि त्यांनी ती वाचली. तेव्हाच बाबांना कळलं की, आम्ही आता प्रेमात पडलो आहोत आणि त्याचदिवशी मी आई-बाबांना नीरजबरोबर लग्न करायला तयार असल्याचं सांगितलं होतं”, असं ती पुढे म्हणाली होती.
दरम्यान, मृणाल दुसानिसच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत छोटा पडदा गाजवला आहे. सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिच्यासह विवेक सांगळे, विजय आंदळकर आणि ज्ञानदा रामतीर्थकरसह, अविनाश नारकर, ऋजुता देशमुखसारखी लोकप्रिय कलाकारही आहेत. ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते.
