Lagnanantar Hoilach Prem Serial New Entry : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या आणि नंदिनी या दोघीही गरोदर असल्याचं पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या घरात सध्या या दोघींचे सगळेजण लाड करत आहेत. पण, नेहमीप्रमाणे काव्या-नंदिनीचा हा आनंद वसु आत्याच्या डोळ्यात खुपणार आहे. काव्या आणि तिच्या बाळाला त्रास देण्यासाठी वसु-रम्या कायम काही ना काही प्लॅन करत असतात. अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी आणखी एक अपडेट समोर आली आहे.
टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट येत असतात. काही वेळा कथानकात लीप येतो तर, काही वेळा मालिकेचं कथानक आणखी रंजक करण्यासाठी नव्या कलाकारांची एन्ट्री होते. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका मुळातच मल्टिस्टारर आहे. मृणास दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, ऋजुता देशमुख, संयोगिता भावे या अभिनेत्री यामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. आता यांच्या जोडीला मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत नव्याने एन्ट्री घेणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे क्षमा देशपांडे. या मालिकेत ती दिव्या देशपांडे ही भूमिका साकारणार आहे. ही दिव्या पार्थच्या ऑफिसमध्ये त्याच्याबरोबर नोकरी करणार आहे. रम्याच्या जागी सिनिअर आर्किटेक्ट ही पोस्ट आता दिव्या सांभाळेल. आता या दिव्याच्या एन्ट्रीचा पार्थ-काव्याच्या संसारावर काय परिणाम होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्षमा देशपांडे यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या ‘उदे गं अंबे’ या मालिकेत झळकली आहे. याशिवाय तिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘इंद्रायणी’ मालिकेत सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली आहे. क्षमा तिच्या एन्ट्रीबद्दल पोस्ट शेअर करत लिहिते, “हाय….मी दिव्या देशपांडे पण, तुम्ही मला दिव्या म्हणू शकता. पाहा आजपासून मला एका नव्या भूमिकेत” या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते. आता दिव्या देशपांडे चांगली आहे की, ती सुद्धा पार्थ-काव्याच्या संसारात विष कालवणार, तिला ऑफिसमध्ये पाठवणं हा वसु आत्याचा प्लॅन तर नसेल ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना थोड्या दिवसांत मिळतील.
