Lagnanantar Hoilach Prem Upcoming Twist: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील जीवा व नंदिनी तसेच काव्या व पार्थ या जोड्या लक्ष वेधून घेतात. तसेच, रम्या व वसू आत्या यांच्या कारस्थानांमुळे मालिकेत विविध ट्विस्ट येताना दिसतात.
मालिकेच्या सुरुवातीला जीवा व काव्या एकमेकांच्या प्रेमात होते, तर पार्थ व नंदिनीचे लग्न ठरले होते. मात्र, ऐन लग्नात वसू आत्याच्या कारस्थानामुळे अशा घडामोडी घडल्या की पार्थला काव्याशी लग्न करावे लागले आणि त्यानंतर जीवाने नंदिनीशी लग्नगाठ बांधली. दोघी बहिणी लग्न करून एकाच घरात आल्या.
सुरुवातीला मतभेद, परिस्थिती स्वीकारण्यास नकार, घटस्फोटाच्या चर्चा झाल्या; त्यानंतर या जोडप्यांमध्ये मैत्री झाली. ते प्रेमातही पडले, मात्र या सगळ्यात काव्या व जीवाने घरच्यांना किंवा पार्थ व नंदिनीला त्यांच्या लग्नाआधीच्या नात्याबद्दल सांगितले नाही. जेव्हा जीवा व काव्याने नंदिनी व पार्थबद्दल प्रेम व्यक्त करण्याचे ठरवले, त्याच दिवशी रम्या व वसू आत्याने त्यांचा भूतकाळ समोर आणला. त्या दिवशी १६ डिसेंबर ही तारीख होती.
आता मात्र रम्या व वसू आत्याचे हे कारस्थान समोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
“आता तुम्हीच ठरवा यांचं…”
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, देशमुख कुटुंब एकत्र बसले आहे त्यावेळी जीवा व पार्थचे वडील विक्रम देशमुख म्हणतात, “१६ डिसेंबरने सगळ्यांनाच आतून तोडलं होतं. पण, आज आपण सगळे छान एकत्र आहोत; तो दिवस कोणी घडवून आणला मला माहीत नाही.” तितक्यात मानिनी एक बॅग घेऊन येते. ती म्हणते, “मी सांगते.” त्यानंतर ती बॅग खाली फेकते. त्यात फोटो, इतर कागदपत्रे दिसतात. मानिनी म्हणते, “या १६ डिसेंबरला रम्या व वसू ताई जबाबदार आहेत.” पुढे ती असेही म्हणते, “आता तुम्हीच ठरवा यांचं काय करायचं आहे. त्यानंतर रम्या व वसू आत्यासमोर काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनी येऊन उभे राहतात.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी काय निर्णय घेतील वसू आत्या आणि रम्याच्या बाबतीत?” अशी कॅप्शन दिली आहे.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “काहीच करणार नाहीत, एकाच टेबलवर बसून नाश्ता करतील”, “जीवा व काव्या त्यांचे आभार मानतील”, “अनपेक्षित आहे, पण काय होतंय बघूया”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
