Lagnanantar Hoilach Prem upcoming twist: मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असल्याचे पाहायला मिळते. या ट्विस्टमुळे मालिकेत पुढे काय होणार ही उत्सुकता वाढते. आपल्या पात्राच्या आयुष्यात नेमके काय वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिकादेखील अशाच मालिकांपैकी आहे. लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या या मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच जीवा आणि काव्या यांचे लग्नापूर्वी एकमेकांवर प्रेम असल्याचे समोर आले होते. त्यानंतर नंदिनी, पार्थ, जीवा, काव्या यांच्या आयुष्यात वादळ आले होते.
मात्र, लग्नानंतर जीवा नंदिनीच्या प्रेमात पडला होता, तर काव्यादेखील पार्थच्या प्रेमात पडली, त्यामुळे जीवाने नंदिनीबरोबरचे आणि काव्याने पार्थबरोबरचे लग्न वाचविण्यासाठी प्रयत्न केले, वेगवेगळे उपाय केले, त्यांची माफी मागितली; पश्चात्ताप करण्याची तयारी दाखवली.
संकटांचा सामना केला. तसेच जीवा व काव्या चांगले मित्र झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता ही दोन्ही जोडपी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे वाटत असतानाच मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.
“काही जोड्यांमध्ये लग्नानंतर प्रेम नाही तर…”
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जीवा नंदिनीच्या हातात काही पेपर्स देतो, तिथे त्याची आई मानिनी आणि वकीलदेखील दिसतात. नंदिनी तो पेपर वाचत म्हणते, “फार्स्ट ट्रॅक्स डिव्होर्स पेपर्स?” त्यावर जीवा ठामपणे म्हणतो, “हो. काही जोड्यांमध्ये लग्नानंतर प्रेम नाही तर डिव्होर्स होतो.” असे म्हणत तो हातातील पेपरवर सही करतो. जीवाचे बोलणे ऐकून नंदिनीला धक्का बसल्याचे दिसते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जीवा म्हणतो, “मी माझ्याकडून जीवा नंदिनीच्या प्रवासाचा शेवट करतोय, तू सुद्धा सही करून या नात्याला पूर्णविराम दे”, असे म्हणत जीवा नंदिनीच्या हातात पेपर आणि पेन देतो. पुढे तो मिसेस नंदिनी जीवा असे म्हणत थांबतो.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “घटस्फोटाचा हा कागद कोणतं नवं वळण देईल जीवांदिनीच्या नात्याला…?”, असे कॅप्शन दिले आहे.
या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “नंदिनीला आता तरी जाणीव होईल का?”, दुसऱ्या एकाने लिहिले, “माणूस एक वेळ प्रयत्न करतो, पण ती पण जास्त करते.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जशास तसे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “नंदिनी तू स्ट्राँग आहेस”, आणखी एकाने लिहिले, “वाह! आता आली मजा.” एकाने लिहिले, “जीवा तुझं बरोबर आहे, आता मागे हटू नकोस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “हा ट्विस्ट आहे, पुन्हा काव्यार्थ आणि जीवांदिनी यांचं लग्न सुखी वैवाहिक आयुष्य बघायचं आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत काय होणार हे पाहणेदेखील उत्सुकेतेचे असणार आहे.

