Mrunmayee Gondhalekar Dance Video: कलाकार त्यांच्या कलाकृतींबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चाहतेदेखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रोजेक्टला प्रेम देतात, तसेच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो, व्हिडीओदेखील शेअर करतात. काही वेळा कलाकारांना प्रेम मिळते तर काही वेळा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो.
मृण्मयी गोंधळेकरचा जबरदस्त डान्स
आता अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज(२९ एप्रिल २०२६) जागतिक नृत्य दिनानिमित्त अभिनेत्रीने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिने ‘आली ठुमकत नार लचकत’ या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव यातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याबरोबरच मृण्मयीच्या पेहरावानेदेखील लक्ष वेधले आहे. तिने सुंदर साडी नेसली आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “आज जागतिक नृत्य दिन आहे. नृत्य म्हणजे भावना, नृत्य म्हणजे उपासना. रखरखत्या उन्हात नृत्याचा गारवा, नृत्याने जणू फुलवला बहावा. नृत्याला माझं मापासून वंदन,अखंडित राहो, माझं अन् माझ्या नृत्याचं मैत्रीचं बंधन”, असे म्हणत मृण्मयीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तू अभिनय व डान्स छान करतेस”, दुसऱ्या एकाने लिहिले, “कमाल”, आणखी एकाने लिहिले, “खूप सुंदर”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री भक्ती रत्नपारखीने लिहिले, “खूप मस्त.” याबरोबरच, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले. ‘आली ठुमकत नार लचकत’ हे गाणे पिंजरा या चित्रपटामधील आहे. हा चित्रपट १९७२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
मृण्मयीच्या कामाबद्दल बोलायचे तर ती झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिने तुळजा ही भूमिका साकारली. सूर्या व तुळजा यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. सूर्याच्या कठीण काळात तुळजा त्याच्यामागे कायम खंबीरपणे उभी राहिल्याचे दिसले. कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. लाखात एक आमचा दादा या मालिकेआधी मृण्मयीने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत राजमाची भूमिका साकारली होती.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर सध्या ती सुभेदार गेस्ट हाऊस या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसत आहे. यामध्ये तिच्याबरोबर शंतनु मोघे आणि सौरभ गोखले प्रमुख भूमिकेत आहेत.
