Bhai Khulawalo Malvani Song : ‘लागिरं झालं जी’, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच नितीश चव्हाण. छोट्या पडद्यावर नितीशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या दोन्ही मालिकांना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये सर्वांसमोर आला आहे.

नितीश नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्युझिक व्हिडीओमध्ये एका भाईची भूमिका साकारताना दिसतोय. या भाईला पहिल्या नजरेतच एक मुलगी आवडू लागते…यानंतर त्याला सर्वत्र तिचेच भास होतात, आणि शेवटी ती पाण्यात बुडत असताना हाच भाई तिचे प्राण वाचवतो असं या गाण्याचं कथानक आहे. तर, कथानकाला अनुसरून या गाण्याचे बोल आहेत, “काय माहीत माका झाला तरी काय…हल्ली माझा खयच लक्ष लागना नाय! भाई खुळावलो…प्रेमात अडकलो, ऐकलंस का?”

‘भाई खुळावलो’ हे मालवणी गाणं असून सुमद्रकिनारीच शूट करण्यात आलं आहे. या गाण्याला लोकप्रिय गायक नागेश मोरवेकर यांनी आपला आवाज दिला आहे. तर, नितीशबरोबर या गाण्यात हिरोईनच्या भूमिकेत झळकलीये, लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव. नितीश-रुचिरा या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान जुळून आलीये याशिवाय त्यांच्या डान्सने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या गाण्याचे दिग्दर्शक प्रितीश कामत आहेत.

नेटकऱ्यांनी या गाण्याच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “जबरदस्त गाणं”, “मालवणी गाणं विथ गोवन टच सुंदर”, “नितीश दादा खुळावलो”, “रुचिरा मस्त दिसलीये”, “म्युझिक-शूटिंग-डान्स सर्वच एक नंबर”, “बॅकग्राऊंड डान्स सुद्धा भारी आहेत”, “एकदम मस्त”, “मालवणी गाणं एक नंबर नितीश दादा”, “नेक्सट लेव्हल साँग”, “मस्त गाणं आहे”, “Vibe आहे गाण्यात” अशा असंख्य प्रतिक्रिया यावर आल्या आहेत.