Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ या कौटुंबिक मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ही मालिका ‘झी मराठी’वर गेली वर्षभर एक तास प्रसारित करण्यात येत आहे. या मल्टिस्टारर मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि तिच्याजागी आता मालिकेत कोणाची वर्णी लागलीये जाणून घेऊयात…

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धूच्या सख्ख्या बहिणीची व लक्ष्मीच्या धाकट्या सुनेची भूमिका अभिनेत्री तन्वी कोलते साकारत होती. या पात्राचं नाव आहे सिंचना. आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, तन्वीने नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली आहे. पहिल्या आठवड्यात ती सर्वत्र चर्चेत सुद्धा आली होती. ‘बिग बॉस’ हा शो जवळपास शंभर दिवस सुरू असतो. त्यामुळे घरात एन्ट्री घेण्यापूर्वी तन्वी कोलतेने ‘लक्ष्मी निवास’मधून एक्झिट घेतली आहे.

आता तन्वीने मालिका सोडल्यावर तिच्याजागी सिंचनाच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर लोकप्रिय अभिनेत्री व सोशल मीडिया स्टार धनश्री पाटील इथून पुढे मालिकेत सिंचनाची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सिंचनाच्या लूकमधील फोटो धनश्रीने सोशल मीडियावर शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. धनश्री लिहिते, “सिंचना आलीये तुम्हाला भेटायला ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत. या प्रवासात मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. माझ्यावर प्रेम करत राहा आणि ही मालिका नक्की बघा”

धनश्री या पोस्टसह मेकअप रूममधील काही फोटो देखील शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता सिंचनाच्या रुपात धनश्रीला मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

दरम्यान, ‘झी मराठी’वर लक्ष्मी निवास मालिका रात्री ८ ते ९ या एक तासाच्या वेळेत प्रसारित केली जाते. या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, मेघन जाधव, दिव्या पुगावकर या कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.