Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत अखेर भावना आणि सिद्धूचं लग्न पार पडलं आहे. यांच्या लग्नसोहळ्यात अनेक अडथळे आले पण, या सगळ्यावर मात करून सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. सिद्धूचं भावनावर असलेलं प्रेम पाहून जान्हवी प्रचंड भारावून जाते. आपली ताई सिद्धूच्या घरी सुखी राहील याची तिला खात्री असते.
मात्र, भावनाला सासरी फक्त सिद्धूचा आधार असतो. बाकीचे सगळे गाडेपाटील कुटुंबीय तिच्या विरोधात असतात. तिला सूनेचा दर्जा देण्यास नकार देतात. सिद्धू-भावनाचं लग्न झाल्यावर आता मालिकेत नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे.
भावना-सिद्धूचा लग्न सोहळा उरकल्यानंतर गाडेपाटलांच्या घरात भावनाच्या गृहप्रवेशाची तयारी सुरु होते. गृहप्रवेशाच्या वेळी भावना आनंदीसह सासरच्या घरात पाऊल टाकण्याचा ठाम निर्णय घेते. पण, रेणुका तिच्या विरोधात उभी आहे. यावेळी सिद्धू ठामपणे आपल्या बायकोची बाजू घेतो.
सिद्धू भावनाला दिलेला शब्द पाळतो आणि तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. मात्र, त्याची आई काही केल्या ऐकत नाही…घराच्या प्रवेशद्वाराजवळ रेणुका आडवी झोपते आणि मुलाला सांगते, “थांबा! सिद्धू खबरदार या घरात पाऊल टाकलंस तर…लग्नाआधीच्या तिच्या या मुलीला आपल्या घरात जागा नाही. नीट ऐक सिद्धू आनंदीला घेऊन जर या तू घरात पाऊल टाकलंस, तर तुला माझं प्रेत ओलांडून यावं लागेल.” आता या कठीण प्रसंगातून सिद्धू कसा मार्ग काढणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
सिद्धूची आजी देखील सार्वजनिक कार्यक्रमात भावनाचा अपमान करणार आहे. हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. तेव्हा देखील सिद्धू बायकोची ठामपणे बाजू घेतो. भावना हळुहळू सिद्धूशी बोलून-चालून राहते आणि आनंदीसाठी इच्छा नसतानाही लग्नानंतरच्या रितीरिवाजात सहभागी होते.
दुसरीकडे, दळवी कुटुंबात संतोषमुळे वाद निर्माण होतात. लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे पैसे नसल्याने त्यांना टोमणे ऐकावे लागतात. पुढे रूमच्या वाटणीवरूनही घरात वाद निर्माण होतो. याशिवाय मालिकेत लवकरच वेंकी जयंतच्या पायावरचा ठसा पाहणार आहे. हा ठसा पाहून जयंतच आपला बालपणीचा मित्र असल्याची आठवण वेंकीला होते. पण जयंत आपल्या भूतकाळातल्या गोष्टी कबूल करेल का? जान्हवी त्याला यासंदर्भातील सत्य समोर आणण्याचा आग्रह करताना दिसणार आहे.
आता जयंतचं सत्य सर्वांसमोर येईल का? भावना-सिद्धूच्या नात्यात काय वळण येणार हे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.