Lakshmi Niwas Fame Actor Anuj Thakare’s New Car : ‘लक्ष्मी निवास’ ही कौटुंबिक महामालिका गेली वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. लक्ष्मी व श्रीनिवास या दोन मुख्य भूमिका हर्षदा खानविलकर व ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी साकारत आहेत. या दोघांचा मालिकेतील धाकटा लेक हरीशने खऱ्या आयुष्यात नुकतीच गाडी खरेदी केली आहे. गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत हरीश ही भूमिका लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकरे साकारत आहे. अनुजने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. “स्वप्न पाहिलं होतं…आज ते स्वप्न स्वत: घेतलेल्या कष्टामुळे पूर्ण होतंय…ही फक्त गाडी नाहीये…हा प्रवास आहे माझ्या मेहनतीचा” असं अनुजने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अनुज व्हिडीओमध्ये आपल्या पत्नीसह नव्या गाडीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनुजच्या पत्नीचं नाव आहे अश्विनी गोरले. ती सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. सध्या अश्विनी गोरले ‘झी मराठी’च्या ‘तारिणी’ मालिकेत काव्या ही भूमिका साकारताना दिसतेय. काव्याला केदार खूप आवडत असतो मात्र, आता केदार तारिणीचं मालिकेत मिशनसाठी का होईना पण लग्न झालेलं आहे.

अनुजने शेअर केलेल्या नव्या गाडीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विकास पाटील, अक्षया देवधर, दिव्या पुगावकर, अक्षय केळकर अशा अनेक कलाकारांनी अनुजच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. तर, गाडी घेताना अनुज व त्याची पत्नी अश्विनी या दोघांनी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना व्हिडीओ कॉल केल्याचं हा व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हर्षदा खानविलकर आणि अनुज यांच्यात ऑनस्क्रीन आई-मुलाचं सुंदर नातं आहे. ऑफस्क्रीन सुद्धा या दोघांनी आई-मुलाचं नातं जपलंय हे आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आता जानू ( जान्हवी ) लवकरच सर्वांसमोर येणार आहे. यानंतर जयंतचं काय होणार? याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.