लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. तिने साकारलेली पाठकबाईंची भूमिका सर्वत्र तुफान लोकप्रिय झाली होती. यानंतर अक्षया काही दिवस छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या माध्यमातून तिने टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक केलं आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ती भावना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेबद्दल आणि यंदाच्या संपूर्ण वर्षाबद्दल अक्षयाने भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षया म्हणते, “माझ्यासाठी २०२५ हे वर्ष खूप खास ठरलं. पहिलं गोष्ट म्हणजे या वर्षाची सुरुवातच खूप छान झाली. ‘लक्ष्मी निवास’ ही आमची मालिका नुकतीच सुरू झाली होती. त्यामुळे या वर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मी खूप आनंदी होते आणि वर्षभर आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. भरपूर चांगलं काम, सातत्याने मेहनत, सकारात्मक वातावरण आणि नवी ऊर्जा हे सगळं २०२५ च्या सुरुवातीपासूनच माझ्या आयुष्यात होतं.”

“२०२५ मध्ये मी पुन्हा एकदा एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आले. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन लोकांबरोबर काम करणं, नव्या नात्यांची बांधणी करणं आणि पुन्हा एकदा ‘झी मराठी’शी जोडलं जाणं, हे सगळं या वर्षांनी मला दिलं असं मी मनापासून म्हणेन. २०२५ मधील माझी सर्वात सुंदर आठवण म्हणजे ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता… तेव्हा झी मराठी मनापासून कौतुक करते. २०२५ मध्ये माझ्या घरी ‘झी मराठी’चे एकूण ४ अवॉर्ड्स आले आणि त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी आणखी खास ठरलं.” असं अक्षयाने सांगितलं.

पुढे, वैयक्तिक आयुष्याबाबत सांगताना अक्षया म्हणाली, “२०२५ च्या सुरुवातीलाच मालिकेच्या शूटिंगसह मी योगा, वर्कआउट आणि ध्यान या सगळ्याची आपण सवय लावून घ्यायची असा निश्चय केला होता. मानसिक आरोग्यासाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, हे मला ठाऊक होतं. मात्र ते शक्य झालं नाही. तरीही मी निराश झाले नाहीये. हा संकल्प मी २०२६ मध्ये नक्की पूर्ण करणार आहे.”

“या वर्षाने मला भरपूर काम दिलं, प्रेक्षकांचं प्रेम आणि पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवून दिली. आता मी थांबणार नाही, सातत्याने काम करत राहणार आहे. २०२५ ने मला पुन्हा एकदा माझ्या पायावर उभं केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद! २०२५ च्या शेवटच्या दिवशीही मी शूटिंगमध्ये व्यग्र असणार आहे. मात्र १ जानेवारी २०२६ ला सुट्टी मिळाली, तर नेहमीप्रमाणे मी माझ्या नवीन वर्षाचा पहिला दिवस मी कुटुंबीयांसह आणि माझा नवरा हार्दिकबरोबर साजरा करणार आहे.” असं अक्षयाने सांगितलं.