Amruta Deshmukh on Body Shaming: ‘फ्रेशर्स’, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांमधून आणि नियम व अटी लागू या नाटकातून अमृता देशमुखने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाली होती. या शोमधूनही तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
अमृताने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल, तिला आलेल्या अनुभवांबद्दल वक्तव्य केले. तसेच, करिअरच्या सुरुवातीचा काळ कसा होता, तिला सेटवर कशी वागणूक मिळत असे याबद्दलही वक्तव्य केले. या मुलाखतीत तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले, असाही खुलासा केला. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
“माझं खूप…”
अमृता म्हणाली, “तुमचं आमचं सेम असतं ही माझी पहिली मालिका होती. तेव्हा निर्मात्याच्या पत्नीकडून माझं खूप बॉडी शेमिंग व्हायचं. त्या मला म्हणायच्या की तुला वजन कमी करायची गरज आहे. हे एका महिन्यात झालं पाहिजे. तशी मी बरी दिसायचे. पण, तेव्हा व्यायाम वगैरे करत नव्हते. त्याचं काही ट्रेनिंग नसतं. हळूहळू कळत जातं. पण, मी बरी दिसत होते. अगदीच त्या पात्राला शोभत नाहीये, असं नव्हतं. “
पुढे ती म्हणाली, “मुद्दा असा आहे की मला त्या भूमिकेसाठी कास्ट केलं, तेव्हा आणि त्यानंतर असा काही बदल झाला नाही. एका महिन्याआधी मी जशी होते, तशी नंतरही होते. जर या सगळ्या गोष्टीमुळे खच्चीकरण होत असेल तर ते योग्य नाही किंवा ते सांगायची पद्धत असते. तू फिट व्हावस, ही पात्राची गरज आहे, तर अमुक अशा गोष्टी कर. तर सांगण्याचीसुद्धा एक पद्धत असते. ते तिथे काही पाळलं जात नव्हतं. नुसतंच एक वर्चस्व दाखवलं जात होतं. तेव्हा असं वाटायचं की आपण चांगले दिसत नाही”, असे म्हणत सुरुवातीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचे अमृताने सांगितले.
अमृता असेही म्हणाली की सुरुवातीला बुजरी होते. त्यामुळे मी त्यांना सांगू शकले नाही की अचानक वजन कमी करू शकत नाही. पण, तो आत्मविश्वास हळूहळू येत जातो. तुम्ही स्पष्टवक्ते असायला हवं. पण, विनम्रतेने तुमचा मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. हे मी नंतरच शिकले. आधी थोडा सहन करण्याकडे कल होता.
अमृता नुकतीच लक्ष्मी निवास मालिकेत सई या भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या ती नियम व अटी लागू या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती रील्स, पती प्रसाद जवादेबरोबरचे व्हिडीओ, तर कधी डान्स व्हिडीओ, फोटो शेअर करते. अमृताचा चाहतावर्ग मोठा आहे.
