पडद्यावर नेहमीच भारदस्त भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हर्षदा खानविलकर यांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. मालिकाविश्वात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, आजवर असंख्य गाजलेल्या मालिकांमध्ये हर्षदा खानविलकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय इंडस्ट्रीत त्यांना प्रेमाने सगळे ‘मम्मा’ म्हणतात.
हर्षदा खानविलकर यांच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत विश्वाची भूमिका साकारणाऱ्या अनुज प्रभूने नुकत्याच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्याबद्दलचा एक खास किस्सा सांगितला आहे.
अनुज हा प्रसंग सांगताना म्हणतो, “मला चांगलं आठवतंय तेव्हा दिवाळी सुरू होती आणि दिवाळीनंतर माझं लगेच शूट नव्हतं. पण, मी त्यादरम्यान असाच एकदा लक्ष्मी निवासच्या सेटवर गेलो होतो. मग, त्यांना समजलं की अनुज आलाय. त्यांनी मला विचारलं की, ‘तू आहेस ना?’ मग काही वेळात त्यांनी मला मिठाईचा बॉक्स दिला आणि त्याच्याबरोबर एक पाकिट होतं. मी त्यांच्या पाया वगैरे पडलो, सगळं झालं… घरी आलो. मला सुरुवातीला वाटलं की, त्या पाकिटात काहीतरी माझ्यासाठी मेसेज वगैरे लिहून एखादी Note असेल. कारण, सुरुवातीला मी नीट पाहिलं नव्हतं.”
अनुज पुढे म्हणाला, “ज्यावेळी मी घरी पोहोचलो…तेव्हा मी पाकिट उघडलं आणि आतमध्ये काय आहे ते पाहिलं तर, त्यात पैसे होते. मी ताईंना मेसेज केला…ताई तुम्ही पैसे कशाला दिलेत? यावर त्या मला म्हणाल्या, जेव्हा घरची मोठी माणसं…घरात जे लहान असतात त्यांना पैसे देतात…तेव्हा त्यांनी प्रश्न विचारायचे नाहीत, पैसे घ्यायचे. कारण, ते आमचं प्रेम आहे.”
“ताईंचा तो मेसेज वाचून त्याक्षणी मी लगेच त्यांना रिप्लाय केला..ताई आता मला समजतंय की, सगळे तुम्हाला ‘मम्मा’ का म्हणतात.” हा सुंदर अनुभव सांगत अनुजने हर्षदा ताईंचं कौतुक केलं.
दरम्यान, हर्षदा खानविलकरांबद्दल सांगायचं झालं तर, २ जुलैला त्यांनी ५३ वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी सगळे लोकप्रिय मराठी कलाकार एकत्र आले होते. या सगळ्यांनी मिळून हर्षदा खानविलकरांना खास Surprise दिलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
