Lakshmi Niwas fame Akshaya Deodhar on Pune Home: ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.
मालिकेतील राणादा आणि अंजली ही जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्यांची केमिस्ट्री, त्यांचे डायलॉग्ज आणि त्यांची गोष्ट या सगळ्याचीच प्रेक्षकांना भुरळ पडली होती. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर अंजली पाठक ही भूमिका अक्षया देवधरने साकारली होती.
प्रेक्षकांना हार्दिक व अक्षयाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर आवडली. पण, त्याचबरोबर त्यांची खऱ्या आयु्ष्यातील जोडीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सध्या अक्षया झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत करत आहे. या मालिकेत तिने भावना ही भूमिका साकारली आहे. मालिकेत भावनाच्या आई-वडिलांचे म्हणजे लक्ष्मी व श्रीनिवास यांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
“प्रेक्षकांसह आमची सगळ्यांचीसुद्धा इच्छा होती की…”
मालिकेतील घराची स्वप्नपूर्ती झाल्याबद्दल भावना म्हणून तिने तिला काय वाटतं, याबद्दल ‘तारांगण’शी संवाद साधताना सांगितले. ती म्हणाली, “प्रेक्षकांसह आमची सगळ्यांचीसुद्धा इच्छा होती की लक्ष्मी-निवासचं घर व्हावं. माझ्या आई-वडिलांनी ते करून दाखवलं याचा मला अभिमान आहे. खूप संकटे आली, दु:खातून गेलो पण कधी हरलो नाही. लक्ष्मी निवास यांनी हेच त्यांच्या मुलांनाही शिकवलं आहे. ते सगळं हे स्वत: करून दाखवतात. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे की आमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत असताना आई-बाबांचं स्वप्नही साकार होत आहे.
“पुण्यातील सदाशिव पेठेतील घर, तिथला आवार, तिथली संस्कृती…”
याबरोबरच, अक्षया देवधरने तिच्या घराच्या आठवणीबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “मला माझ्या लहानपणीची घराची आठवण आहे. म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठेतील घर, तिथला आवार, तिथली संस्कृती त्या आठवणी कधीच मनातून पुसल्या जाणार नाहीत. ते घर अजूनही आहे. माझे आई-बाबा तिथे राहतात”, असे म्हणत तिला पुण्यातील घराच्या आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत, असे सांगितले.
दरम्यान, आता मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
