Harshada Khanvilkar Birthday Post : ‘झी मराठी’ वाहिनीची ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना नुकताच भावना आणि सिद्धूचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर लक्ष्मीची प्रमुख भूमिका साकारत आहेत. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये हर्षदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण मालिकाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
हर्षदा खानविलकर यांनी ‘पुढचं पाऊल’, ‘रंग माझा वेगळा’, ‘ऊन पाऊस’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा सगळ्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यांची ‘पुढचं पाऊल’मधील अक्कासाहेब ही भूमिका प्रचंड गाजली होती. इंडस्ट्रीत अनेक वर्षे सक्रिय असल्याने त्यांची अनेक कलाकारांशी घट्ट मैत्री आहे. याशिवाय इंडस्ट्रीतील काही कलाकारांना हर्षदा खानविलकर यांनी अडचणीच्या काळात देखील खंबीरपणे साथ दिली आहे; असं त्या कलाकारांनी अनेक मुलाखतींमध्येही सांगितलं आहे.
यामुळेच हर्षदा खानविलकरांना इंडस्ट्रीत सगळे प्रेमाने ‘हर्षदा मम्मा’ अशी हाक मारतात. तर, काही कलाकार त्यांना ‘ताई’ देखील म्हणतात. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत त्यांच्या ऑनस्क्रीन लेकीची म्हणजेच भावनाची भूमिका साकारणाऱ्या अक्षया देवधरने देखील खास पोस्ट शेअर केली आहे.
अक्षया देवधर म्हणते, “माझ्या आयुष्यातील आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! हर्षदा ताई अशीच आनंदी राहा… तुझ्यासारखा विचार कोणीही करू शकत नाही. तुझ्यासारखं प्रत्येकावर प्रेम कोणीही करू शकत नाही… मी खरंच भाग्यवान आहे म्हणून माझ्या आयुष्यात तू आलीस, आपली भेट झाली. आपलं हसणं, आपल्या गप्पा आणि एकत्र बसून कॉफी पिणं हे आयुष्यभर असंच सुरू राहुदेत…”
दरम्यान, अक्षयासह दिव्या पुगावकर, अनुज ठाकरे, आशुतोष गोखले, अनुष्का पिंपुटकर, सुयश टिळक, प्रिया बापट, अनघा अतुल, सुप्रिया पाठारे, संग्राम समेळ अशा अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत हर्षदावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.