मालिकांमध्ये आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे कलाकार यावेळी ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मध्ये एका अनोख्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या परफॉर्मन्समध्ये प्रत्येक पात्राची खासियत एका वेगळ्या रूपात सादर केली जाणार आहे. प्रत्येक खलनायकाला एका विशिष्ट प्राण्याची शक्ती देण्यात आली आहे. या अनोख्या संकल्पनेतून खलनायकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत. या खास परफॉर्मन्समध्ये ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील इंदुराणी, ‘दीपज्योती’ मालिकेतील प्रीती, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत’, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील भैरवी आणि ‘कमळी’ मालिकेतील अनिका सहभागी होणार आहेत.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव सांगतो, “हा परफॉर्मन्स माझ्यासाठी एकदम वेगळा अनुभव होता! मी याआधी कधीही असं काही केलं नव्हतं. आम्ही सुरुवातीला रिहर्सल केल्या. आमचे कोरिओग्राफर जे होते, त्यांनी हा परफॉर्मन्स खूप छान पद्धतीने तयार केला. त्यांनी मला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायरची भूमिका साकारणार आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे अनुष्काला ‘व्हॅम्पायर डायरीज’ ही मालिका खूप आवडते. जेव्हा मी तिला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायर होणार आहे, तेव्हा ती माझ्यापेक्षाही जास्त उत्सुक झाली होती.”
जयंत पुढे म्हणाला, “आम्ही या परफॉर्मन्ससाठी थोडा सराव केला होता. पण प्रत्यक्ष परफॉर्मन्सच्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो, कारण मला इतका भारी डान्स करता येत नाही. जेव्हा मला सांगितलं की, हा परफॉर्मन्स थेट प्रेक्षकांसमोर होणार आहे, तेव्हा मग थोडं दडपण आलं होतं. कारण, थेट प्रेक्षकांसमोर डान्स करणं हा माझ्यासाठी अगदी नवीन अनुभव होता आणि त्यामुळे जबाबदारीही मोठी होती. काही तांत्रिक आणि वेळापत्रकाच्या अडचणींमुळे आम्हाला हा परफॉर्मन्स आधीच शूट करावा लागला. पण रात्रभर शूटिंग करूनही, फक्त तीन तासांची झोप घेऊन मी परफॉर्मन्ससाठी आलो. माझं संपूर्ण लक्ष परफॉर्मन्सवर होतं. शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच टेकमध्ये परफॉर्मन्स पूर्ण झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन केलं होतं आणि देवाच्या कृपेने ते छान जमलं. आता हा परफॉर्मन्स टीव्हीवर कधी पाहायला मिळतो, याची मला उत्सुकता आहे.”


विशेष म्हणजे मेघनबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या कुटुंबातले तीन सदस्य सध्या झी मराठीच्या तीन वेगवेगळ्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मेघन स्वत: ‘लक्ष्मी निवास’मध्ये झळकतोय, त्याची पत्नी अनुष्का पिंपुटकरने ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तर, मेघनचा सख्खा मोठा भाऊ अभिनेता मंदार जाधव ‘धाकट्या सूनबाई’मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.
