Lakshmi Niwas fame Lakshmi gave advice: ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका विविध ट्विस्टमुळे कायमच चर्चेत असते. मालिकेत नेमकं काय घडणार, काय ट्विस्ट येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून जयंत जान्हवीच्या शोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. जान्हवी त्याच्याकडे परत यावी यासाठी तो काहीही करत असल्याचे दिसते.

दुसरीकडे श्रीकांतच्या मृत्यूची केस कोर्टात सुरू आहे. मात्र, श्रीकांत जिवंत असल्याचे समोर आले आहे. आता श्रीकांतच्या परत येण्याने सिद्धू, भावना आणि आनंदीचे आयुष्य कसे बदलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मालिकेतील लक्ष्मी आणि श्रीनिवास हे कायमच लक्ष वेधून घेतात. ते त्यांच्या कुटुंबाला जपण्यासाठी अनेक प्रयत्न करतात, मात्र त्यांना सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण, कुटुंबावर येणाऱ्या अडचणी, घरात होणारी भांडणं या सगळ्यांबाबत लक्ष्मी आणि श्रीनिवास एकत्र सामोरं जातात. तसेच, ते कायमच एकमेकांना साथ देतात.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लक्ष्मी ही भूमिका हर्षदा खानविलकर यांनी साकारली आहे. आता झी मराठीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की लक्ष्मीला एक चिठ्ठी दिली जाते, त्यामध्ये लिहिले असते की अशी एखादी गोष्ट सांगा की तुम्ही लाईटली घेतली पाहिजे.

“प्रत्येक स्त्री जी आई आहे…”

त्यावर लक्ष्मी म्हणते, “फक्त मीच नाही, तर प्रत्येक स्त्री जी आई आहे, तिने एक गोष्ट लाईटली घेतली पाहिजे ती म्हणजे, जेव्हा कुठल्याही स्त्रीला मुलगी होते तेव्हा नकळत ती तिच्या लेकीच्या आयुष्याची, तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते किंवा तिला सतत काळजी वाटत असते की आपली मुलगी योग्य शिक्षण घेईल का, तिचं करिअर चांगलं होईल का, बाहेर तिला कोणी त्रास देणार नाही ना, मग सासरी जाईल तेव्हा तिचा संसार चांगला होईल ना? अशा अनेक चिंता आईला वाटत असतात.”

पुढे लक्ष्मी म्हणते, “मला वाटतं की आईने या गोष्टी थोड्याशा लाईटली घेतल्या पाहिजेत. तू तुझ्या लेकीला जन्म दिला आहेस, ती सक्षम आहे आणि ती सबळसुद्धा आहे. ती तुझं नाव रोशन करणार आहे, त्यामुळे या गोष्टी प्रत्येक स्त्रीने लाईटली घेतल्या पाहिजेत.”

हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तुम्हालाही पटतंय ना लक्ष्मीचं म्हणणं?”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, जान्हवी जिवंत सत्य असल्याचे सत्य लक्ष्मी-श्रीनिवास पुढे कसे येणार, जयंतपासून जान्हवीला विश्वा कसे वाचवणार, नेमकं काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.