Lakshmi Niwas fame Payal Pande announce pregnancy: झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. अगदी सुरुवातीपासूनच मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘लक्ष्मी निवास’मधील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.
लक्ष्मी व श्रीनिवास हे जोडपे त्यांच्या कुटुंबासाठी सतत कष्ट करताना दिसते. आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाते. त्यांना पाच मुले आहेत. भावना, मंगल, जान्हवी, हरीश व संतोष ही त्यांची पाचही मुले वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. त्याबरोबरच लक्ष्मी व श्रीनिवास यांनी व्येंकीला मुलगा मानले आहे. व्येंकीदेखील त्यांना आई-वडील मानतो. त्यांना वेळोवेळी मदत करतो. अडचणीच्या काळात तो सर्वांत पुढे असतो.
व्येंकी व त्याची पत्नी आरती घरातील सर्वांचे लाडके आहेत. व्येंकीची पत्नी आरतीदेखील त्याच्यासारखीच मेहनती आहे. ती कष्ट करण्यासाठी घाबरत नाही. आता ती कोर्ससाठी पंजाबला गेल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून आरती मालिकेत दिसत नाही.
‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच होणार आई
आरती मालिकेत का दिसत नाही, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. आता याचे उत्तर समोर आले आहे. अभिनेत्री पायल पांडेने आरती ही भूमिका साकारली आहे. पायलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
पायलने शेअर केलेले हे फोटो तिच्या डोहाळजेवणाचे आहेत. फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे की, तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. तसेच, हातावर मेंदी काढली आहे. तिच्या मेंदीत आई-बाबा असे लिहिलेले आहे. दुसऱ्या हातावर आई व बाळाचे चित्र काढले आहे. त्याबरोबरच तिचे मंगळसूत्र आणि नथही लक्ष वेधून घेत आहे. तिच्या मंगळसूत्रात आहो असे लिहिल्याचे दिसत आहे; तर नथीत आई ही अक्षरे दिसत आहेत. पायल या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाली?
तिने हे फोटो शेअर करताना, ‘मातृत्वाच्या कोमल क्षणात गुंफलेला आनंद’, अशी कॅप्शन दिली आहे. पायलच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “म्हणून मालिकेतून गायब आहेस होय. छान, काळजी घे. गोड दिसतेस गं. आरती आम्हाला तुझी खूप आठवण येते.” दुसऱ्या एकाने लिहिले, “लक्ष्मी निवासमध्ये तुला मिस करतोय. तुला शुभेच्छा.” आणखी एकाने लिहिले, “तरी विचार करतोय की, आरती गेली कुठे?” एकाने लिहिले, “किती गोड दिसतेस.” दुसऱ्या एकाने लिहिले, “मालिका बघताना वाटतंच होते, तुझं खूप अभिनंदन!”, अशा अनेकविध कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी मालिका बघताना आठवण येते, असे म्हटले आहे. तसेच, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होताना दिसत आहे.




चाहत्यांबरोबर कलाकारांनीदेखील कमेंट्स करीत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.मेघना एरंडे, तन्वी कोलते, संजना काळे यांनी कमेंट्स करीत पायलला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीला लक्ष्मी निवासमध्ये पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
