Lakshmi Niwas fame Payal Pandey reveals baby name: अभिनेत्री पायल पांडेला ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील आरती या भूमिकेतून लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी डोहाळजेवणाचे फोटो शेअर करीत ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता पायलने काही फोटो शेअर करीत तिला मुलगा झाल्याचे सांगितले आहे. तसेच त्याचे नाव काय ठेवले आहे, याबद्दलही खुलासा केला आहे.

‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई

पायल पांडेने सोशल मीडियावर पती व मुलाबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोमध्ये तिच्या मुलाची झलकही दिसत आहे. पायल व तिच्या नवऱ्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हे फोटो शेअर करीत तिने लिहिले, “हजारो स्वप्नं आणि हजारो न केलेल्या प्रार्थनांच्या मध्ये कुठेतरी तू आमच्यापर्यंत येण्याचा तुझा मार्ग शोधलास. तुझ्या येण्यानं आमचं आयुष्य आम्ही कल्पनाही केली नव्हती, इतकं सुंदर झालं आहे. आम्ही दोनाचे तीन झालो आहोत, आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे.”

पुढे तिने लिहिले, “आम्हाला मुलगा झाला आहे. त्याचं नाव वीर असं आहे. हा छोटासा जीव आमच्या आयुष्यात आल्यानंतर आमचं जग मोठं वाटू लागलं आहे.”

पायलने असेही लिहिले, “आता आमचं कुटुंब तीन जणांचं झालं आहे. आमची ही नवीन सुरुवात आहे.” पायलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तन्वी कोलतेने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अनुज ठाकरेने, “खूप खूप प्रेम”, असे लिहिले आहे. तर, चाहत्यांनीदेखील पायल व तिच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

एकाने लिहिले, “खूप प्रेम”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप सुंदर फोटो आहेत”, आणखी एकाने लिहिले, “वीर कसा गोड आहे. ब्रँड न्यू आई-बाबाचं खूप अभिनंदन”, एकाने लिहिले, “अभिनंदन, पालकत्वाच्या या सुंदर प्रवासात तुझं स्वागत आहे”, आणखी एकाने लिहिले, “क्यूट दिसत आहात. तुमचं अभिनंदन”, एकाने लिहिले, “प्रताप व पायल खूप शुभेच्छा”, एकाने लिहिले, “वीरला खूप खूप प्रेम आणि आई-बाबांचं अभिनंदन”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी पायल, तिचा नवरा प्रताप व मुलावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, आता मुलाच्या जन्मानंतर पायल कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.