Zee Marathi Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या जयंतचं वेगळंच रुप जान्हवीसमोर येऊ लागलं आहे. त्याला बायकोने माहेरच्या लोकांशी संवाद साधलेला आवडत नाही, आपल्या जवळच्या मित्रांशी हात मिळवणं, हसून बोलणं पटत नाही. एकंदर जान्हवीने केवळ माझंच ऐकावं अशी जयंतची इच्छा असते. पण, जान्हवीचा स्वभाव पहिल्यापासून सर्वांना सामावून, सर्वांशी हसत-खेळत वागून आनंदात जीवन जगावं असा असतो. तर, दुसरीकडे जयंत हा प्रचंड विकृत असतो. त्याच्या भूतकाळात सुद्धा अनेक घटना घडलेल्या असतात. याचा उलगडा हळुहळू मालिकेत होणार आहे.

काही दिवसांपूर्वी जान्हवीने पार्टीत गाणं गायल्यामुळे जयंत भयंकर चिडतो. घरी आल्यावर तिला सोफ्यावर बसवून तो रात्रभर गाणं गाण्याची शिक्षा देतो. यामुळे जान्हवीचा घसा आधीच बसलेला असतो. तर, लग्नानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी जयंतने ‘झुरळ’ खाल्लं असं मालिकेत दाखवण्यात आलं होतं. आता हळुहळू जयंत जान्हवीबरोबर आणखी क्रूर वागणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये त्याने विकृतीचा कळस गाठून आपल्या पत्नीला भयंकर शिक्षा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

“जानू तू कॉलेजमध्ये सगळ्यांना टोपणनावं द्यायचीस. आता मलाही काहीतरी टोपणनाव दे…कोणतं नाव मला सूट होईल? ‘सायको?’ कॉल मी ‘सायको’…हाक मार मला…सायको…” असं जयंत दमदाटी करून जान्हवीला सांगतो. पण, ती नवऱ्याला ‘सायको’ बोलण्यास सुरुवातीला तयार नसते.

शेवटी जयंत बळजबरीने आरडाओरडा करून तिच्या तोंडून ‘सायको’ असं वदवून घेतो. जान्हवी यानंतर त्याला घाबरत, अडखळत ‘सायको’ म्हणते. जयंत पुढे म्हणतो, “मी ‘सायको’ वाटतो तुला? इतर मित्रांची नावं बबलगम, कुकी आणि मी सायको…तू तुझा भूतकाळ सुद्धा मला सांगत नाहीयेस. म्हणजे तुझ्याकडून चूक झालीये. यासाठी जानू तुला शिक्षा मिळाली पाहिजे. गुडघ्यावर बस…”

हा भयंकर प्रोमो पाहून मालिकेच्या चाहत्यांच्या मनात जान्हवीच्या नशिबी पुढे वाढून ठेवलंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, प्रेक्षकांनी या प्रोमोवर “समाजात काय संदेश देत आहात… हा फुकटचा छळ आहे.”, “हा झुरळवाला जरा जास्तच करायला लागला आहे”, “बावळटपणा” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

lakshmi niwas
लक्ष्मी निवास – नेटकऱ्यांच्या प्रोमोवर कमेंट्स

दरम्यान, लक्ष्मी निवास मालिका झी मराठी वाहिनीवर दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत म्हणजेच जवळपास १ तास प्रसारित केली जाते.