Zee Marathi Lakshmi Niwas Serial : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लवकरच एक नवीन वळण येणार आहे. पहिल्या दिवसापासून निलांबरीला भावनाचं चांगलं झालेलं बघवत नसतं. त्यात भावना गरोदर असताना निलांबरी अनेक कटकारस्थानं करते. तिचे हे सगळे कारनामे सिद्धू पुराव्यानिशी उघड करतो आणि यामुळे निलांबरीला घरातून बाहेर काढा असा निर्णय गाडेपाटील घेतात. पण, आजीच्या मध्यस्थीमुळे निलांबरी थोडक्यात वाचते.

सध्या इलेक्शनमुळे निलांबरीवर आपण कोणातीही कारवाई करू शकत नाही असं आजीचं म्हणणं असतं. त्यामुळेच निलांबरीला कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाहीये. पण, तिचा खरा स्वभाव सर्वांसमोर उघड झाल्यामुळे सगळे तिच्यापासून दुरावले गेले आहेत. अगदी तिचा स्वत:चा नवरा सुद्धा तिच्यापासून दुरावतो, या सगळ्याचा निलांबरीला भयंकर त्रास होतो. त्यामुळे मालिकेत आता ती एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

निलांबरी गाडेपाटलांची मोठी सून असल्याने ती नेहमी पारंपरिक साडी, भरपूर दागिने, केसांची वेणी या लूकमध्ये मालिकेत दिसली आहे. पण, आता सर्वांसमोर खरा चेहरा उघड झाल्यावर निलांबरी एका वेगळ्या रुपात सिद्धू-भावनाच्या आयुष्यात एन्ट्री घेणार आहे.

भावनाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सुरू असताना निलांबरी दारू पिऊन घरी पोहोचते. यावेळी तिचा लूक पूर्णपणे वेगळा असतो. सिल्व्हर रंगाचा शॉर्ट बॉडीकॉन वनपीस, मोकळे केस, डोळ्यात राग, हातात दारूची बाटली अशा हटके रुपात निलांबरी दळव्यांच्या घरी पोहोचणार आहे.

भावना यावेळी सुंदर उखाणा घेत म्हणते, “ओटी प्रेमाची ऊब जाणवू लागली… ऐका साऱ्या जणी सिद्धीराज अन् माझं स्वप्न पूर्ण झालं गं…कुणीतरी येणार येणार गं” हा उखाणा पूर्ण होताच…दारात निलांबरी येऊन उभी राहते आणि म्हणते, “येणार नाही..आलीये!” आता भावना-सिद्धूच्या सुखावर निलांबरी घाव घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निलांबरीला या अशा नव्या अवतारात पाहून भावनाला चांगलाच धक्का बसतो. यावेळी सिद्धीराज पुढे येऊन आपल्या बायकोला सावरतो. याशिवाय निलांबरीचं रूप पाहून सासुही शॉक होते. आता ही रूप बदलून आलेली निलांबरी कोणतं नवीन कारस्थान रचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी इतरवेळी सोज्वळ रुपात मालिकेत झळकलेल्या निलांबरीला ओळखलंच नाहीये. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. हा विशेष भाग प्रेक्षकांना २४ मे रोजी एक तासांच्या महाएपिसोडमध्ये दुपारी २ वाजता पाहायला मिळेल.