Zee Marathi Updates : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १३ एप्रिलपासून ‘दीपज्योती’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे यांच्या प्रमुख भूमिका असतील. ‘दीपज्योती’ मालिका रात्री आठ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे. सध्या आठ वाजता हर्षदा खानविलकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मी निवास’ मालिका ऑन एअर होते.

गेल्या वर्षभरात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘लक्ष्मी निवास’चं काय होणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. अनेक चाहते कमेंट्समध्ये ‘लक्ष्मी निवास’ मालिका संपवू नका अशी विनंती करत होते. अखेर ‘झी मराठी’ने स्वत: पोस्ट शेअर करत ‘लक्ष्मी निवास’ संपणार नाहीये अशी अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिका संपणार नसून, ही सिरियल आता एका नव्या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. ‘दीपज्योती’ मालिका १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याआधी ‘झी मराठी’ दोन मालिकांच्या वेळेत बदल करेल.

Award Banner

‘झी मराठी’ने दोन मालिकांची वेळ बदलली..

‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिका आता एका नव्या वेळेत प्रसारित केल्या जातील. दोन्ही मालिकांची नवीन वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.

प्रेक्षकांनी या पोस्टच्या कमेंट्समध्ये या मालिकांचे नवीन टाइम स्लॉट काय असतील याचाही अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लक्ष्मी निवास’ आता ६:३० वाजता असेल आणि ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची वेळ ६ वाजताची करतील असं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी सावलीची मालिका आता दुपारी ऑन एअर होईल असंही वाटतंय. लवकरच ‘झी मराठी’कडून या दोन्ही मालिकांची नवीन वेळ काय असेल हे जाहीर केलं जाईल.

दरम्यान, नव्याने सुरू होणाऱ्या ‘दीपज्योती’ मालिकेत पूर्वा आणि प्रसादसह डॉ. गिरीश ओक, ओमकार गोवर्धन, मानसी सुभाष, अनुप बेलवलकर हे कलाकार झळकणार आहेत. ही मालिका १३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.