Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिका गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. आता लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. ‘लक्ष्मी निवास’च्या कथानकात तब्बल सात वर्षांचा लीप आला आहे. सात वर्षांनंतर दळव्यांच्या घरात काय-काय बदल झालाय. भावना-सिद्धू, जान्हवी-विश्वा यांचं नातं कोणत्या वळणावर आहे? मालिकेत कोणत्या नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार अन् कोणाची एक्झिट झालीये याचा उलगडा नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये झालेला आहे.

दळव्यांची घरची परिस्थिती आता पूर्णपणे बदलली असून लक्ष्मी यशस्वी उद्योजिका म्हणून नावारुपाला आलीये. पण, या सगळ्यात तिच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीनिवासची सुटलेली साथ. श्रीनिवासचं निधन झालंय, त्यामुळे त्याची स्वप्न आता मुलांच्या साथीने लक्ष्मी पूर्ण करतेय. श्रीनिवास निधन झाल्याचं दाखवण्यात आल्याने ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी यांची मालिकेतून एक्झिट झालेली आहे.

तुषार दळवींच्या एक्झिटवर चाहते काहीसे नाराज झाले आहेत. “निवासला का गायब केलं? याला काय अर्थ आहे राव?”, “लक्ष्मी निवास या संकल्पनेतून निवासलाच बाजूला केलंय”, “अरे श्रीनिवास लीड आहेत…त्यांना का बाजूला केलं?” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

याशिवाय भावना आणि लक्ष्मी या मायलेकींमध्ये दुरावा आलेला आहे. भावनाच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्यात यामध्ये आनंदीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री शुभवी गुप्ते साकारणार आहे. तिची या मालिकेत नव्याने एन्ट्री झालेली आहे.

पण, भावना-सिद्धू दुरावले आहेत…यासाठी भावना आपल्या आईला जबाबदार ठरवते. ती गेली सात वर्षे लक्ष्मीशी बोलत नाहीये. त्यामुळे हा दुरावा सिद्धू दूर करणार असं वचन त्याने लक्ष्मीला दिलेलं आहे. दुसरीकडे, जान्हवी-विश्वाचं लग्न झालेलं असून ते एकत्र आनंदाने आपल्या मुलासह संसार करत आहेत.

आता सर्वांनाच एक महत्त्वाचं प्रश्न पडलाय तो म्हणजे जयंतचं काय झालं? जान्हवी अन् लक्ष्मीमुळे गेली सात वर्षे जयंत जेलमध्ये असतो. त्याची सुटका झाल्यावर तो लक्ष्मी-जान्हवीचा बदला घ्यायचा असा निश्चय करतो. आता सायको जयंतला यात यश मिळणार की नाही हे आगामी भागात स्पष्ट होईल.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत हा सात वर्षांचा लीप येत्या १५ ऑगस्टपासून येईल. दररोज दुपारी दीड वाजता ही मालिका प्रसारित केली जाते. आता सात वर्षांत बऱ्याच गोष्ट बदलल्या आहेत आणि प्रत्येकाला ही दुरावलेली नाती जुळवायची आहेत. आता यामध्ये लक्ष्मीला यश मिळणार की नाही हा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.