Lakshmi Niwas New Twist : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी विश्वाच्या घरी तनुजा म्हणून वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवीने विश्वाच्या घरी राहण्यासाठी आपली ओळख बदलली असून, जयंतच्या वागणुकीचं सगळं सत्य तिने आता विश्वाला सांगितलेलं आहे. दुसरीकडे दळवी कुटुंबाला जान्हवी आपल्याला कायमची सोडून गेलीये असं वाटतंय. लक्ष्मी आपल्या धाकट्या लेकीच्या आठवणीत रात्रंदिवस भावुक होत असते.

जान्हवीला सुद्धा आपल्या घरच्यांची प्रचंड काळजी वाटत असते. पण, जयंतला घाबरून तिने आपली ओळख लपवून ठेवलेली आहे. पण, आता लवकरच या ड्रामाचा शेवट होऊन जान्हवी पुन्हा एकदा सर्वांसमोर येणार आहे.

जान्हवी अजूनही जिवंत आहे हे सत्य आता जयंतसह दळवी कुटुंबासमोर उघड होणार आहे. पण, या सगळ्यात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. नेहमी जयंतला घाबरणारी जान्हवी मोठ्या धीराने त्याचा सामना करणार आहे.

जयंत जान्हवीला भेटायला विश्वाकडे येतो. तो तिला “जानू..जानू” असा आवाज देत असतो. इतक्यात जान्हवी मागून येते ज्यामुळे जयंत थोडासा घाबरतो. जान्हवी त्याला म्हणते, “हीच भीती मला तुझ्या चेहऱ्यावर बघायची होती. जयंत आता मी सर्वांसमोर येतेय. माझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठी…” आता खेळ पालटणार आहे कारण, जान्हवी जयंतला रडवण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. “याची गरज होती”, “एक नंबर आम्हाला हेच हवं होतं”, “वॉव जयंतला चांगलंच रडव…हेच आधी केलं असतं तर आज ही वेळ नसती आली”, “जान्हवी धमाका कर…या जयंतला तुझ्या तालावर चांगलंच नाचव”, “वॉव याला म्हणतात प्रोमो”, “टीआरपी सुद्धा जयंत-जान्हवीच्या ट्रॅकमुळे वाढेल”, “जान्हवीचं नवीन रूप मस्तच” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी मराठी’वर दररोज १ तास प्रसारित केली जाते. आता फेब्रुवारीचे २८ दिवस जान्हवी जयंतला कशी रडवणार हा ट्रॅक प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल. जानूचं हे नवीन रूप पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.