Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गाडेपाटलांकडून भावनाच्या स्वयंवराचं आयोजन करण्यात आलेलं असतं. पण, प्रत्यक्षात भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून सिद्धू असतो हे सत्य कोणालाच माहिती नसतं. आता लवकरच हे सत्य वेंकीसमोर उघड होणार आहे. यानंतर वेंकी थेट जाऊन सिद्धूची भेट घेतो आणि काहीही करून लवकरात लवकर तू केलेली चूक मान्य कर आणि प्रेमाची कबुली दे असं सिद्धूला हातवारे करून सांगतो.
जर सिद्धूने वेळीच भावनाची जबाबदारी स्वीकारली नाहीतर वेंकी सगळं सत्य जाऊन लक्ष्मी, भावना आणि पूर्वीला सांगणार असतो. देवीच्या उत्सवात सिद्धूला भावनाशी लग्न करण्याचा कौल मिळालेला असतो आणि आता ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर मालिकेत येणार आहे.
पूर्वी आणि सिद्धूचं लग्न जाहीर करण्यासाठी गाडेपाटलांकडून विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं असतं. यावेळी सिद्धू सर्वांसमोर त्याने केलेली चूक आणि भावनावर असलेलं प्रेम सर्वांसमोर कबूल करण्याचा निर्णय घेतो.
सभेत सर्व उपस्थितांशी संवाद साधण्यापूर्वी सिद्धू भावनाला हात धरून सर्वांसमोर आणतो. सिद्धू म्हणतो, “आज वेळ आलीये गाडेपाटलांची धाकटी सून तुम्हाला प्रत्यक्ष दाखवण्याची… या आहेत गाडेपाटलांच्या खऱ्या सूनबाई. भावना श्रीनिवास दळवी…ही माझी होणारी बायको नसून त्या आधीपासूनच माझ्या पत्नी आहेत. देवीचा कौल घेऊन मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं.”
सिद्धूचा खुलासा ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी असतं आता ती लाडक्या सिद्धूला जावई म्हणून स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग १० आणि ११ जून रोजी रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. नेटकरी हा प्रोमो पाहून खूश झाले आहेत. “फायनली सिद्धू बोलला”, “एक नंबर सिद्धू”, “आता खरी मजा येणार”, “याला म्हणतात प्रोमो जबरदस्त ट्विस्ट”, “भारी लवकर दाखवा”, “कधीपासून वाट पाहत होतो या एपिसोडची”, “हे स्वप्न नसूदेत..मस्तच सिद्धू”, “बरं झालं सर्वांसमोर त्याने कबूल केलं..एक नंबर प्रोमो” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.