Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या जान्हवी आणि श्रीनिवासने आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवी घराबाहेर पळून जाते. पण, रस्त्यावर फिरणारं एक जोडपं पाहून जान्हवीला पुन्हा आपल्या नवऱ्याची आठवण येते आणि ती माघारी येण्याचा निर्णय घेते.
आता जान्हवी जयंतबरोबर नव्याने संसाराला सुरुवात करणार आहे. पण, जयंतचं वागणं आधीसारखं राहणार की बदलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर, दुसरीकडे… नोकरी गेल्यामुळे श्रीनिवासने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली आहे. उतारवयात आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी श्रीनिवास प्रचंड कष्ट घेत असल्याचं मालिकेत पाहायला मिळतंय.
या सगळ्या घडामोडी सुरू असल्या तरीही सिद्धूचं भावनावर असलेलं प्रेम तिळमात्रही कमी झालेलं नाही. भावनाला इम्प्रेस करण्यासाठी सिद्धू नवनवीन युक्त्या शोधून काढतोय. तो भावनाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. काहीही करून सिद्धूला भावनाशी लग्न करायचं असतं पण, नियतीच्या मनात सध्या काहीतरी वेगळंच आहे.
सिद्धूच्या कुटुंबीयांनी सिद्धूची होणारी बायको आणि गाडेपाटलांची धाकटी सून म्हणून पूर्वी भालेरावची निवड केलेली असते. पूर्वी ही गुणाजी रावांची मुलगी असते. पूर्वी आणि सिद्धूचं लग्न झाल्यावर गाडेपाटलांना राजकीय क्षेत्रात सुद्धा फायदा होणार असतो शिवाय, सिद्धू आणि पूर्वी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात. त्यामुळे सगळ्यांना हे लग्न मान्य असतं. पण, या लग्नाबद्दल सिद्धूची मनधरणी कशी करायची या विचारात सगळे असतात.
आता अचानक घरात सजावट करून सिद्धूच्या साखरपुड्याचा घाट घालण्यात येणार आहे. सिद्धू तयार होऊन बाहेर येतो आणि साखरपुड्याला आलेल्या भावनाला पाहतो. भावना पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत असते. आपला साखरपुडा भावनाशी होणार असं सिद्धूला वाटतं पण, घडतं काहीतरी वेगळंच… अचानक मंडपात त्याच्यासमोर पूर्वी येऊन उभी राहते. आपली बायको म्हणून पूर्वीला पाहून सिद्धूला मोठा धक्का बसतो. तो प्रचंड भावुक होतो, त्याला अश्रू अनावर होऊन त्याच्या हातातून साखरपुड्याची अंगठी निसटते. ती अंगठी भावनासमोर पडल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आता साखरपुड्यानंतर सिद्धूचं भावनाशी लग्न करण्याचं स्वप्नं मोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल. आता सिद्धू-भावनाच्या नात्यात नवीन काय वळण येणार हे प्रेक्षकांना १२ एप्रिलच्या विशेष भागात पाहायला मिळेल. ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते.