Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना अन् सिद्धूचं लग्न केव्हा होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो बहुप्रतीक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धू भावनाशी गुपचूप तिच्याही नकळत लग्न करणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार आहे जाणून घेऊयात…
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत देवीचा उत्सव साजरा होत आहे. दळवी, गाडेपाटील आणि इतर अनेक कुटुंबीय या उत्सवात सहभागी झाले आहेत. देवीच्या उत्सवादरम्यान विश्वा-जान्हवी, विश्वा-जयंत आणि सई-जान्हवी यांच्या नात्यात देखील अनेक उलगडे होणार आहेत. एकीकडे हे सगळं घडत असताना वेंकी आणि आरतीमध्ये प्रेमाचं नातं बहरताना दिसतंय.
मात्र, सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना सिद्धूच्या आईकडून पुन्हा एकदा भावनाचा अपमान होतो. त्यामुळे भावना प्रचंड रडते. आता काही करून भावना मॅडमसमोर आपलं मन मोकळं करायचं असं सिद्धू ठरवतो. आता याबद्दल जयंत देखील सिदूधची समजूत काढणार आहे.
अपमान झाल्यावर भावना खूप रडते आणि शेवटी देवळात जाऊन ती शांतपणे जप करत बसलेली असते. यावेळी तिचे डोळेही बंद असतात इतक्यात सिद्धू मागून येऊन तिच्या गळ्यात गुपचूप मंगळसूत्र घालणार आहे. आता भावनाच्याही नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलं आहे. तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र कोणी घातलंय याचा विचार करून भावना प्रचंड अस्वस्थ होणार आहे.
गळ्यात मंगळसूत्र पाहून भावनाला मोठा धक्का बसतो. ती स्वतःला वचन देते की, जोपर्यंत जबाबदार व्यक्ती पुढे येत नाही, तोपर्यंत ती मंगळसूत्र काढणार नाही. घरात सर्वांना जेव्हा भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं कळणार आहे तेव्हा त्यांना सर्वांनाही मोठा धक्का बसणार आहे.
दुसरीकडे, देवीच्या उत्सवाचा प्रसाद देताना… लक्ष्मीचा भाऊ दिग्विजय लक्ष्मीला प्रसाद द्यायला नकार देतो. तो तिचा आणि श्रीनिवासचा अपमान करून तो रिक्षा चालक आहे हे बोलून दाखवणार आहे. लक्ष्मी श्रीनिवासच्या मागे ठामपणे उभी राहत कोणतीही नोकरी लाजिरवाणी नसल्याचे स्पष्ट करत तिला आपल्या नवऱ्याचा अभिमान असल्याचं ठामपणे सांगते.
दरम्यान, आता मंगळसूत्र घालणारा दुसरा-तिसरा कोणी नसून तो सिद्धू आहे हे सत्य सर्वांसमोर केव्हा येणार? भावनाला हे सत्य समजल्यावर तिचा काय निर्णय असेल…असे अनेक खुलासे या महामुहूर्ताच्या निमित्ताने होणार आहेत. ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री आठ ते नऊ या एक तासांच्या वेळेत प्रसारित केली जाते.