Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ ही मल्टिस्टारर कौटुंबिक मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. साधारण वर्षभर ही मालिका रात्री ८ ते ९ या एक तासाच्या वेळेत प्रसारित केली गेली. आता या मालिकेची वेळ बदलणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ आता दुपारच्या सत्रात ऑन एअर होईल. दुपारी १:३० ते २:३० या वेळेत ही मालिका प्रसारित केली जाईल. वेळेत बदल झाल्यावर ‘लक्ष्मी निवास’मध्ये तीन मोठे ट्विस्ट येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भावनाचं आयुष्य तर संपूर्णपणे बदलणार आहे. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना गरोदर असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, गाडेपाटलांचा वंश भावनाच्या पोटी जन्माला येऊ नये अशी क्रूर भावना तिच्या जाऊबाईच्या मनात असते. भावनाला आणि तिच्या बाळाला त्रास देण्यासाठी निलांबरी अनेक प्रयत्न करताना दिसतेय. याशिवाय सिद्धिराजला राजकारणात एन्ट्री मिळू नये यासाठी देखील निलांबरीचे प्रयत्न सुरू असतात. पण, तिचे हे सगळे डाव आता निष्फळ ठरणार आहेत. कारण, भावनाच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे सिद्धू!

आता सिद्धूच्या जागी भावनाची राजकारणात एन्ट्री होणार आहे. ती इलेक्शन लढवणार असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. आता भावना राजकारणात एन्ट्री घेणार आणि सिद्धू बायकोची आणि बाळाची दोघांची काळजी घेणार असं या प्रोमोमध्ये म्हणतोय. त्यामुळे गाडेपाटलांच्या घरच्या राजकारणाला निश्चितच एक वेगळं वळण मिळणार आहे.

जान्हवीचं विकृत जयंतशी पुन्हा लग्न

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत येणारा दुसरा महत्त्वाचा ट्विस्ट आहे तो म्हणजे जयंत-जान्हवीचं लग्न. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीला जुनं काहीच आठवत नाहीये असं पाहायला मिळतंय. जयंत पुन्हा एकदा तिला आपला चांगुलपणा दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढतोय. दोघांचं पुन्हा एकदा लग्न सुद्धा होणार आहे. पण, यावेळी वेळ बदललीये.

गृहप्रवेश करताना जान्हवीला जुन्या सगळ्या गोष्टी आठवतात. जयंतने तिला कसा त्रास दिला होता…त्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जातात. यावेळी ती मनोमन म्हणते, “मी या घराचं माप ओलांडतेय पण, तुला जन्माची अद्दल घडवायला. आता वेळ बदलणार”

‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील तिसरा ट्विस्ट

आता श्रीनिवासचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी लक्ष्मी पुढाकार घेणार आहे. आपली दोन्ही मुलं कधीच आपल्या मदतीला येणार नाहीत याची लक्ष्मीला पूर्ण खात्री असते. त्यामुळे आता श्रीनिवास आणि लक्ष्मी दोघं एकत्र मिळून त्यांचं अनेक वर्षांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहेत.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावनाची राजकारणात एन्ट्री, जयंत-जान्हवीचं पुन्हा लग्न आणि लक्ष्मी-श्रीनिवासची हक्काच्या घरासाठीची मेहनत असे तीन जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. येत्या १३ एप्रिलपासून मालिकेत हे नवीन ट्विस्ट पाहायला मिळतील. ही मालिका आता दुपारी दीड वाजता प्रसारित केली जाणार आहे.