Lakshmi Niwas upcoming twist: आपल्या हक्काचं घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. हे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण दिवस-रात्र मेहनत करीत असतात. लक्ष्मी व श्रीनिवास यांचंही स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न होते. अनेक वर्षांपासून ते काबाडकष्ट करीत आहेत. मात्र, मुले, त्यांचे शिक्षण, इतर अडचणी यांमुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले होते. आता मात्र ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील या जोडप्याचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेत लक्ष्मी व श्रीनिवास यांचे कुटुंब पाहायला मिळते. त्यांना पाच मुले आहेत. व्येंकीला त्यांनी मुलगा मानले आहे. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. भावना व जान्हवी या दोघी गोड स्वभावाच्या; पण धीट, खंबीर अशा आहेत. हरीश काही वेळा चांगले वागतो, काही वेळा स्वार्थीपणे विचार करतो; तर संतोष फक्त स्वत:चा विचार करतो. व्येंकीला बोलता येत नसले तरी व्येंकी लक्ष्मी व श्रीनिवासची काळजी घेतो आणि संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागतो.

आता लक्ष्मी व श्रीनिवासचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तर, याच प्रोमोमध्ये जयंतचे सत्य सर्वांसमोर येणार असल्याचेदेखील दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लक्ष्मी व श्रीनिवास त्यांच्या नवीन घरात प्रवेश करतात. सगळे जण आनंदात आहेत. सगळे पारंपरिक वेशभूषेत तयार झाले आहेत. पूजेला घरातील सर्व जण हजर आहेत. ‘लक्ष्मी निवास’ची पाटीदेखील दिसते.

“…तुला आता या जगातून जावंच लागणार”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जान्हवीची आजी झोपली आहे. तिथे जान्हवीचा नवरा जयंत येतो. तो तिला म्हणतो, “मी जान्हवीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण ती माझं ऐकतच नाही. त्यामुळे आता तुला आता या जगातून जावंच लागणार”, असे म्हणून जयंत उशी घेतो आणि आजीच्या तोंडावर ठेवतो. आजी ओरडण्याचा प्रयत्न करते. तितक्यात जान्हवी तिथे येते. ती त्याला कानाखाली मारते आणि म्हणते, “जयंत तुझ्या पापाचा घडा भरला.” त्यानंतर ती त्याला खोलीतून बाहेर ओढत आणते. आवाज ऐकून घरातील सर्व जण एकत्र येतात. जान्हवी जयंतला म्हणते, “आता मी तुला सोडणार नाही.” हे सर्व पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न व चिंता दिसते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एकीकडे ‘लक्ष्मी निवास’चं स्वप्न पूर्ण होणार; तर दुसरीकडे होणार जयंतचा टाइम अप”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखवल्याप्रमाणे, जयंत व जान्हवीच्या लग्नानंतर जयंत अनेकदा विकृतपणे वागला. त्याने जान्हवीला विचित्र शिक्षा दिल्या. तसेच, तिच्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जान्हवीसमोर जयंतचे हे सत्य आले, त्यावेळी तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. जान्हवीने समुद्रात उडी मारली. त्यातून ती वाचली. त्यानंतर काही दिवस ती विश्वाच्या घरी राहिली. ज्यावेळी ती स्वत:च्या घरी आली, त्यावेळी ती मागच्या काही वर्षातील गोष्टी विसरली होती. याचदरम्यान, तिने पुन्हा एकदा जयंतबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाच्या दिवशी तिला सर्व काही आठवले; परंतु तिने कोणालाही सत्य सांगितले नाही. जयंतचा बदला घ्यायचा या उद्देशाने तिने त्याच्याशी लग्न केले.

काही दिवसांपासून जयंतने तिला जसा त्रास दिला होता, तसाच त्रास ती आता जयंतला देत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.