Lalit Prabhakar entry Lakshmi Niwas: अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या ‘सुपर डुपर’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्ये निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
सिनेमाच्या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. सध्या कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. विविध मुलाखती, पॉडकास्ट, मालिकांमध्ये हे कलाकार हजेरी लावत असल्याचे दिसत आहे.
‘लक्ष्मी निवास’मध्ये ललित प्रभाकरची एन्ट्री
काही दिवसांपूर्वीच ललित प्रभाकर झी मराठी वाहिनीच्या ‘तारिणी’ या मालिकेत दिसला होता. ललित व विदुलाने तारिणी व केदारच्या संगीत सोहळ्यात हजेरी लावली होती. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतदेखील त्याची झलक पाहायला मिळणार आहे. जान्हवीचा मित्र म्हणून तो मालिकेत दिसणार आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जयंत आधीच जान्हवीच्या घरी आला आहे. तितक्यात एक मुलगा येतो, त्याला जान्हवी रोहित म्हणून हाक मारते आणि घरात ये असे म्हणते. त्यांची भेट झाल्यानंतर रोहित म्हणतो की तुला भेटून खूप बरं वाटलं. पुढे जान्हवी त्याला म्हणते की आई शेजारीच आहे, मी तिला पटकन बोलावून आणते. हे सगळं जयंत पाहत असतो. जान्हवी तिथून गेल्यानंतर जयंत रोहितला म्हणतो, “कोण आहेस तू? आणि माझ्या बायकोच्या जवळ जाण्याची हिंमत कशी झाली?”, असे म्हणत जयंत त्याची कॉलर धरतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सिद्धूच्या घरी पूजा सुरू आहे, या पूजेला भावना व निलांबरी दोघी बसल्या आहेत. आजी सांगते की, जिच्या कुशीत ही बाळरामाची मूर्ती जाते तिची कुस लवकर उजवते. त्यानंतर ती मूर्ती निलांबरीच्या ओटीत ठेवली जाते. मात्र, ती उठताना ती मूर्ती हवेत फेकली जाते व भावनाच्या पदरात ती मूर्ती पडते. त्यानंतर भावना चक्कर येऊन खाली पडते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जान्हवीच्या मित्रामुळे जयंतचा राग होणार अनावर”, अशी कॅप्शन दिली आहे.
जान्हवी तिच्या भूतकाळातील गोष्टी विसरली आहे. विश्वा हा तिचा जवळचा मित्र आहे, तिचे जयंतबरोबर लग्न झाले होते, या गोष्टी तिला आठवत नाहीत, त्यामुळे मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
आता मालिकेत नेमकं काय घडणार, जयंतच्या धमकीला रोहित काय उत्तर देणार, भावनाच्या आयुष्यात नेमके काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
