Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी सात वर्षांचा लीप आल्याचे पाहायला मिळाले. सात वर्षांत अनेक गोष्टी बदलल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीनिवासचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीने उद्योजिका म्हणून उद्योगविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लक्ष्मीने सिद्धूमुळे श्रीनिवासचा मृत्यू झाल्याचा जबाब दिला होता, त्यामुळे सिद्धूला सात वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्याचा राग भावनाच्या मनात आहे. तसेच, जान्हवीला त्रास दिल्याप्रकरणी जयंतसुद्धा इतकी वर्षे तुरुंगात होता.
आता सात वर्षांनंतर मालिकेत अनेक गोष्टींत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. जयंत व सिद्धू दोघेही तुरुंगातून बाहेर आले आहेत. भावना व लक्ष्मी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. भावनाच्या मनात लक्ष्मीबद्दल कटुता आहे. जान्हवी व विश्वाचे नुकतेच लग्न झाले आहे. जयंत जेलमधून बाहेर पडल्या क्षणापासून पुन्हा जान्हवीबद्दल माहिती मिळवत आहे. इतकेच नाही तर त्याने लक्ष्मीच्या घरी जाऊन तिला धमकीही दिली आहे. आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ट्विस्ट
झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जान्हवी व विश्वा हे ‘चाहे तुम कुछ ना कहो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करत आहेत, तर दुसरीकडे जयंतने जान्हवीचा फोटो लावला आहे. तो त्या फोटोकडे पाहत म्हणतो, “तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, तुझ्या आजूबाजूला कोणीच असू शकणार नाही, तुला कोणी स्पर्शही करू शकणार नाही. कारण तुझ्यावर फक्त माझा आणि माझाच हक्क आहे.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जान्हवीच्या नव्या आयुष्यात जयंत विष कालवणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे. जयंतच्या परत येण्याने जान्हवीच्या आयुष्यात नेमके काय बदल होणार? तो पुन्हा जान्हवीला त्रास देणार का? विश्वा व जयंतचे नाते कसे वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, लक्ष्मी जयंतला त्याचा हेतू साध्य करण्यापासून रोखू शकणार का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
