स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. राहुलच्या साखरपुड्याच्या दिवशी कलाने चांदेकर कुटुंबासमोर राहुलचं सत्य उघड केलं आहे. अद्वैतच्या लग्नाच्या दिवशी नयना आणि राहुल ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याचं फुटेज कलाने सगळ्यांना दाखवलं आणि नयनाच्या प्रेग्नेंसीबद्दलही खुलासा केला. यामुळे राहुलचा साखरपुडा तर मोडलाचं, परंतु त्याच्या अश्या वागण्याने चांदेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता राहुलला काय शिक्षा मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

नयनाच्या प्रेग्नेंसीचे रिपोर्ट्स काढून ते खरे आहेत की नाही हे ही चांदेकर कुटुंब पडताळणार आहेत. नव्या प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे अद्वैत लवकरच नयना आणि राहुलच्या लग्नाचा घाट घालणार असल्याचं दिसतंय. यात अद्वैत सगळ्यांना सांगतो, “चूक आपली आहे, त्यामुळे आपल्यालाच ती निस्तरावी लागणार आहे. नयना प्रेग्नेंट आहे, त्यामुळे ही गोष्ट बाहेर कोणालाही कळण्याआधी आपल्याला राहुल आणि नयनाचं लग्न लावून द्यायला हवं. “

हेही वाचा… मानसी नाईक पुन्हा एकदा पडली प्रेमात? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “असा कोणीतरी आहे जो…”

कला अद्वैतचे आभार मानत त्याला म्हणते, “थॅंक्स, एवढं सगळं घडल्यावरसुद्धा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवलास. पण, आता आपल्याला नयना ताईच्या आणि राहुलच्या लग्नाबद्दल बघायला हवं.”

हेही वाचा… “४ महिन्यांची लेक एकटी…”, २६/११ ला पतीसह ताजमहाल हॉटेलमध्ये अडकलेली सोनाली खरे

अद्वैत आणि कलाचं बोलणं ऐकून अद्वैतची आई रजनी कलाला म्हणते, “एक मिनिट, हा प्रश्न चांदेकरांचा आहे, त्यात तुला पडायची काहीच गरज नाही आहे.”

एकीकडे राहुलला आपल्या चुकीचा पश्चाताप झालेला दिसत नाहीये, तर कलाने राहुलचं सगळं सत्य चांदेकर कुटुंबासमोर आणलंय. आतातरी कलाची बाजू कोणी समजून घेईल का? राहुल आणि नयनाचं लग्न खरंच पार पडेल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल.

हेही वाचा… “…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरली असून ती घराघरात पाहिली जातेय. टीआरपीमध्येही ही मालिका आपलं स्थान रोवून उभी आहे. अभिनेत्री इशा केसकर आणि अभिनेता अक्षय कोठारी मुख्य भूमिकेत असून किशोरी अम्बिये, अभय खडपकर, दीपाली पानसरे, अपूर्वा सकपाळ, रोहिणी नाईक आणि इतर कलाकारांच्याही निर्णायक भूमिका आहेत.