Lalit Modi clarifies he is not going to participate in Bigg Boss 20: ‘बिग बॉस’ हा सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो मानला जातो. या शोमध्ये विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती सहभागी होतात. फक्त भारतातीलच नाही, तर अनेकदा परदेशांतील व्यक्तीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात. या शोमधून पडद्यावर दिसणारे कलाकार, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात कशा वागतात, इतरांना कशा वागवतात, त्यांची जीवनमूल्ये काय आहेत यांवरून एकंदरीत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज प्रेक्षकांना येतो.

‘बिग बॉस २०’मध्ये कोणते स्पर्धक असणार, याचा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत. या सगळ्यात ललित मोदींच्या नावाची चर्चा होत होती. आता ललित मोदींनी स्वत: एक्सवर पोस्ट शेअर करत ते बिग बॉस २० मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले, “‘बिग बॉस २०’साठी माझ्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही. मी ‘बिग बॉस २०’ मध्ये सहभागी होणार नाही आणि बिग बॉसमध्ये जाण्याचा माझा हेतूही नाही.”

त्यांनी असेही लिहिले, “माझ्याशी कोणतीही चर्चा न करता किंवा सत्यता न तपासता याबद्दल लिहिले गेले, ही आश्चर्याची बाब आहे. माझ्या वकिलांनी नोटीस दिली आहे. कदाचित पुढच्या वेळी, काहीही प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही पडताळणी कराल.”

‘या’ कारणामुळे ललित मोदी १६ वर्षांपासून भारताबाहेर राहत आहेत

ललित मोदी विविध कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतात. ते १६ वर्षांपासून भारत सोडून परदेशात राहत आहेत. ललित मोदी आयपीएलचे संस्थापक आहेत. आयपीएलचे दुसरे पर्व दक्षिण आफ्रिकेत पार पडले होते. त्यावेळी स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे सामने घेतल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. त्यावर त्यांनी त्यांनी सांगितले होते की, भारतात त्यावेळी लोकसभेची निवडणूक होणार होती आणि त्यामुळे भारतात आयपीएलचे सामने घेणे शक्य नव्हते.

त्याबरोबरच ईडीने आरोप केला होता की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय २४३ कोटींहून अधिक किमतीचे परकीय चलन परदेशी संस्थेकडे हस्तांतरित केले.परकीय चलनाचे केले गेलेले हे हस्तांतर व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन असल्याचे ईडीने म्हटले होते. ईडीने २०११ मध्ये ललित मोदी, बीसीसीआयचे काही माजी अधिकारी आणि इतर काहींना ‘फेमा’ (FEMA)अंतर्गत ’कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती आणि २०१८ मध्ये त्यांच्यावर दंड आकारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या आदेशाला ‘साफेमा’ (SAFEMA) अपील न्यायाधिकरणासमोर आव्हान देण्यात आले होते.

अपीलीय न्यायाधिकरणाने नुकतेच २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल ‘फेमा’ (FEMA) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ललित मोदींवर लादलेला दंड रद्द केला आहे.

इतकेच नाही, तर बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन व ललित मोदींचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यावेळी ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये नसल्याचे सांगितले.

दरम्यान, दरवर्षीप्रमाने सलमान खान या बिग बॉस २०चे सूत्रसंचालन करणार आहे. २० सप्टेंबरनंतर हा शो सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.