Bharti Singh Baby Boy Face Reveals : आपल्या विनोदी स्वभावाने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ‘लाफ्टरक्वीन’ भारती सिंग. भारती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील दैनंदिन अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने तिच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा दाखवला आहे.

टीव्हीवरील अनेक विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारतीचे स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे, ज्यावर ती तिचे व्लॉग व्हिडीओ शेअर करीत असते. या व्हिडीओंमधून अभिनेत्री आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया तसेच त्यांचा मुलगा गोला यांची धमाल मजामस्ती पहायला मिळते. अशातच तिने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने दुसरा मुलगा यशवीर अर्थात काजूचा चेहरा पहिल्यांदाच दाखवला आहे. 

युट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला भारती सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. या सणाच्या शुभमुहूर्तावर तिने मुलाचा चेहरा सर्वांना दाखवणार असल्याचे सांगते. यानिमित्त भारतीने घरात एक छोटेसे गेट-टू-गेदरसुद्धा ठेवले होते. या खास कार्यक्रमासाठी हर्ष आणि भारतीच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. 

मुलाचा चेहरा दाखवण्याच्या या खास कार्यक्रमासाठी तिने स्टुडिओमध्ये खास सजावटसुद्धा केली होती. पुढे गुलाबांच्या फुलांमागून भारती आणि हर्ष लाडक्या लेकाचा चेहरा दाखवतात. भारतीच्या मुलाला पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केले आहे.

“काजूला कुणाची नजर न लागो”, नेटकऱ्यांकडून कौतुक

भारतीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्समधून चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला एका तासांत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी कमेंट केली आहे. या व्हिडीओवर “काजू अगदीच भारतीसारखा दिसतोय”, “काजूला कुणाची नजर न लागो”, “भारतीची दोन्ही मुले तिच्यासारखीच दिसतात”, “काजूला अनेक अनेक आशीर्वाद”, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, १९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारती-हर्षने आई-बाबा झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर महिनाभरानंतर त्यांनी लाडक्या लेकाचं बारसंसुद्धा केलं. अशातच गुढीपाडव्याच्या दिवशी तिने त्याचा चेहरा पहिल्यांदा सर्वांसमोर रिव्हिल केला आहे.      

भारती आणि हर्ष यांनी ३ डिसेंबर २०१७ रोजी गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी पहिल्या मुळला जन्म दिला. त्याचे नाव लक्ष्य असं आहे. तर २०२५ मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.