Priya Berde on daughter Swanandi: आपल्या आवडत्या कलाकारांची मुले काय करतात, हे जाणून घेण्याची अनेक चाहत्यांची उत्सुकता असते. अनेक कलाकारांची मुले आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात करतात. तर काही करिअरचा वेगळा मार्ग निवडतात.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मराठी सिनेसृष्टीत मोठे योगदान आहे. त्यांचे चित्रपट आजही पाहिले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही कलाकार जोडी प्रचंड गाजली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांची मुले कोणत्या क्षेत्रात काम करतात?
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना दोन मुले आहेत. स्वानंदी व अभिनय बेर्डे अशी त्यांची नावे आहेत. अभिनय हा कला क्षेत्रात काम करत असल्याचे दिसत आहे. तो ‘ती सध्या काय करते’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’, ‘बॉइज ४’, ‘दशावतार’, ‘वडापाव’ अशा चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.
तर मुलगीदेखील कलाक्षेत्रात काम करताना दिसते. ‘रिस्पेक्ट’, ‘मन येड्यागत झालं’, अशा प्रोजेक्टसाठी ती ओळखली जाते. तिने काही दिवसांपूर्वी दागिन्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. कांताप्रिया असे या ब्रँडचे नाव आहे.
“स्वानंदी फक्त अभिनय सोडून बाकी सगळं…”
आता प्रिया बेर्डे यांनी ‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीत मुलगी स्वानंदीबाबत वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, “स्वानंदी फक्त अभिनय सोडून बाकी सगळं करते. ती भरतनाट्यम शिकते. ती उत्तम चित्रकार आहे. ती ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्रमध्येसुद्धा थोडंफार काम करते. तिचा कांताप्रिया हा दागिन्यांचा ब्रँड आला आहे. ती आता लॉ चे शिक्षण घेत आहे. ती खूप साऱ्या गोष्टी करते. त्यामुळे ती अभिनयापासून थोडी बाजूला राहिली तर मला काही प्रॉब्लेम नाही.”
“तिला सुरुवातीपासून डेस्क जॉब हवा होता किंवा तिला असं काहीतरी हवं होतं जे तिच्या अधिकाराखाली असेल, असं तिला काहीतरी करायचं होतं. मी तिला म्हणाले की तुला जर ऑफर येत आहेत, तर तू अभिनय क्षेत्रात काम कर. भविष्यात तुला या गोष्टीचा पश्चाताप नको की मी केलं असतं तर बरं झालं असतं. कोणत्याही गोष्टींबाबत खुलेपणाने विचार केला पाहिजे.”
“ते सगळं मी माझ्या डोक्यातून…”
पुढे त्या म्हणाल्या, “मी अमुक हीच गोष्ट करेन आणि अमुक एखादी गोष्ट करणार नाही, असं माणसाने करू नये. कधी कोणती संधी चांगली येईल आणि ती यशस्वी होईल हे तुम्हाला माहिती नसतं. जसं माझ्याबद्दल बोलायचं तर पूर्वी मला चित्रपट आणि नाटकच आवडायचं. मालिका फार जमायच्या नाहीत. २०-२० दिवस आपण कसा अभिनय करायचा असं माझ्या डोक्यात यायचं. ते सगळं मी माझ्या डोक्यातून काढून टाकलं. आता मला छान कामं मिळत आहेत.” असे म्हणत मुलगी स्वानंदी विविध क्षेत्रात काम करत असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रिया बेर्डे काजळमाया या मालिकेत काम करत आहेत.
