Lokesh Gupta on comeback on tv after 9 years: आता झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘शुभ श्रावणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अनेक कलाकार दिसणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. अभिनेते लोकेश गुप्ते नऊ वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.

लोकेश गुप्ते काय म्हणाले?

यादरम्यानच्या काळात ते लेखन आणि दिग्दर्शनात काम करताना दिसताना दिसले. आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी सीरियल्स ऑफिशियलबरोबर साधलेल्या संवादात ते म्हणाले, “मी नऊ वर्षांनंतर अभिनय करणार आहे. या नऊ वर्षांत मी प्रामुख्याने दिग्दर्शन आणि लेखनावर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा अभिनयाच्या कॅनव्हासला स्पर्श करताना वेगळीच ऊर्जा जाणवत आहे.”

पुढे ते म्हणाले, “अभिनयातून ब्रेक घेण्यापूर्वी मी झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका केली होती. खरं सांगायचं तर, मी बहुतेक मालिका मी झी मराठीबरोबरच केल्या आहेत. आता या ब्रेकनंतर पुन्हा एका झी मराठीच्या एका नवीन शोमधून कमबॅक करत आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

Award Banner

शुभ श्रावणी मालिकेत शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के ही भूमिका लोकेश गुप्ते साकारणार आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये त्यांचा लूक पाहायला मिळाला. तसेच, त्यांच्या स्वभावाची झलकही दिसली. त्यांची मुलगी श्रावणी व त्यांच्यात दुरावा असल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा थोडा रागीट आणि कडक स्वभाव असल्याचेदेखील पाहायला मिळाले.

विश्वंभर राजेशिर्के यांची मुलगी श्रावणी ही आनंदी, सतत हसमुख असल्याचे दिसते. मात्र, वडिलांपासून असलेल्या दुराव्यामुळे ती दु:खी असल्याचे दिसते. वडिलांनी एकदा का होईना, प्रेमाने जवळ घ्यावं, अशी तिची इच्छा आहे; पण तिची इच्छा अपूर्ण राहिली आहे. श्रावणी ही भूमिका अभिनेत्री वल्लरी विराजने साकारली आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेनंतर वल्लरीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मालिकेत शुभंकर हे पात्रही मध्यवर्ती दिसते. तो श्रावणीला वेळोवेळी साथ देताना दिसणार आहे. तो शांत, समंजस व प्रगल्भ असल्याचे पाहायला मिळत आहे. ही भूमिका सुमित पाटीलने साकारली आहे.

दरम्यान, लोकेश गुप्ते यांनी याआधी अग्निशिखा, जुळून येती रेशीमगाठी, खुलता कळी खुलेना, वादळवाट, आभास हा, लज्जा या मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता शुभ श्रावणी मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.