‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री माधवी निमकर घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेलं ‘शालिनी’ हे पात्र नकारात्मक असलं तरीही प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. सध्या अभिनेत्री ‘तुझ्या सोबतीने’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. माधवी नेहमीच आपल्या फिटनेसकडे काटेकोरपणे लक्ष देते. त्यामुळे तिच्या सौंदर्याची, फिटनेसची सर्वत्र चर्चा होत असते.
फिट राहण्यासाठी माधवी नेमकं काय काय करते याबाबत तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. माधवी निमकर म्हणाली, “सकाळी उठल्यावर मी ड्रायफ्रूट्स खाते. त्यानंतर चहा पिते पण प्रमाणात…कारण, सेटवर आल्यावर मी स्ट्राँग कॉफी पिते. दररोज सकाळी आठ-साडेआठ वाजता मी न चुकता ब्रेकफास्ट करते. घरी असो किंवा सेटवर नाश्ता करायला मला खूप आवडतं. कारण, संध्याकाळचं जेवण मी सात वगैरे वाजता जेवते. त्यामुळे सकाळी भूक लागणं स्वाभाविक आहे. सकाळी नाश्ता झाला आणि त्यानंतर कधी मध्येच भूक लागली तर मी फळं खाते. दुपारी साधारण एक ते दीड वाजता आमचा लंच ब्रेक होतो… त्यावेळी मग दुपारचं जेवणं जेवायचं.” अभिनेत्रीला भाकरी खायला खूप आवडतं. पण, सकाळी बनवलेली भाकरी दुपारपर्यंत कडक होते त्यामुळे लंचला माधवी चपात्या घेऊन येते आणि रात्री भाकरी खाते.
सायंकाळी सातनंतर काहीच खात नाही…
“दुपारचं जेवण झाल्यावर पुढचे दोन तास मी काहीच खात नाही. दुपारी चार-साडेचार वाजता मग माझा Tea ब्रेक असतो. मग रात्री सात वाजता मी जेवते त्यानंतर अजिबात काहीच खात नाही.” असं माधवीने सांगितलं. तसेच भाताने वजन वगैरे वाढतं असं काही नसतं…प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणात खाल्ली पाहिजे असं माधवीने नमूद केलं. उदाहरणार्थ, छोटी भाकरी आणि थोडा भात खाल्ला तर चालेल पण, तुम्ही ३ पोळ्या आणि भात खाताय तर वजन वाढणारच आहे, असं अभिनेत्री म्हणाली.
वजन घटवण्यासाठी टिप्स
ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा सगळ्यांसाठी टिप्स ते अभिनेत्री म्हणाली, “मी दोन गोष्टी सांगते, शुगर ( साखर ) बंद करा…दिवसातून दोन चमचे साखर तुमच्या शरीराला चालते. जी आपल्या जेवणातून आपल्याला मिळते. पण, अतिरिक्त शुगर बंद करा. याशिवाय किमान दररोज १ तास चाला, ३ लिटर पाणी प्यायलं पाहिजे याशिवाय वेगळं काहीच करायची नाही. याने फॅटलॉस होतो. मी सुद्धा सतत पाणी पित असते.”
दरम्यान, माधवी निमकरने आजवर ‘हम तो तेरे आशिक है’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

