Madhavi Nimkar Fitness Tips: अनेकांना कामानिमित्त दिवसभर खुर्चीवर बसावे लागते, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कंबरदुखी सारख्या समस्याही जाणवण्याची शक्यता असते.
पुरेसा व्यायाम न करणे, शरीराची हालचाल न करणे, संतुलित आहार नसणे, पोष्ठिक पदार्थ न खाणे याबरोबरच योग्य प्रमाणात पाणी न पिणे, पुरेशी झोप न घेणे, जंक फूड खाणे या आणि अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. ज्यामध्ये केसगळतीपासून, त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
फिटनेस जपण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने आहाराची काळजी घ्यावी लागते. चौरस आहार असणे महत्वाचे आहे.
आता अभिनेत्री माधवी निमकरने अभिजात मराठीच्या युट्यूब चॅनेलवर मेथीचे लाडू कसे बनवायचे आणि त्याचा उपयोग काय याबद्दल सांगितले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
माधवी म्हणाली, “मेथीचे लाडू कमाल लागतात. मी माझ्या आईच्या हातचे मेथीचे लाडू खूप आवडीने खाते. साधी, खूप छान रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही घरी केल्यानंतर तुम्ही म्हणाल की ही इतकी सोपी आणि उपयुक्त रेसिपी आहे. यासाठी कणिक, थोडीशी मेथी पाऊडर आणि तूप याच गोष्टी लागणार आहेत. जसा आपण बेसनाचा लाडू बनवतो, तसाच आपल्याला मेथीचा लाडू बनवायचा आहे. पण, बेसनाच्या लाडूसाठी आपण बेसन वापरतो, मेथीच्या लाडूसाठी गव्हाचं पीठ वापरायचं आहे.
“हे लाडू फक्त केसांसाठी नाही तर…”
लाडू कसे बनवायचे, हे सांगत माधवी म्हणाली, “गव्हाचं पीठ तूपामध्ये भाजून थोड्याप्रमाणात साधारण दोन चमचे मेथी टाकायची आहे आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यात सुका मेवा किंवा तुम्हाला त्यामध्ये आणखी काही टाकायचे असल्यास तुम्ही टाकू शकता. जे तुमच्या शरीरासाठी पोषक आहे. त्याचे लाडू बनवा.
पुढे मेथीच्या लाडू खाण्याचे फायदे सांगत ती म्हणाली, “हे लाडू फक्त केसांसाठी नाही तर कंबरेसाठी, जर तुमची कंबर दुखत असेल तर त्यासाठी खूप महत्वाचे आहेत. गर्भवती स्त्रियांना, बाळ झाल्यानंतर मेथीचे लाडू खायला घालतात”, असे म्हणत माधवी निमकरने मेथीचे लाडू खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
सूचना: माधवी अनेकदा युट्यूबच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. माधवीप्रमाणेच अनेक कलाकारही मुलाखती, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना कोणत्या समस्यांसाठी कोणत्या उपायांचा फायदा झाला. तसेच, फिटनेस जपण्यासाठी ते कोणते व्यायाम करतात, याबरोबरच, त्यांचे डाएट काय असते अशा अनेक गोष्टींबद्दल ते सांगतात. मात्र, इतरांनी सांगितलेले उपाय जशेच्या तसे न वापरता तुमच्या तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य उपाय करणे आणि उपचार घेणे महत्वाचे ठरते.
