Madhavi Nimkar Shares Skin Care Tips : माधवी निमकर मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’वरील ‘तुझ्या सोबतीने’ मध्ये खलनायिकेच्या भूमिकेतून झळकत आहे.
माधवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. माधवी अभिनयासह तिच्या फिटनेससाठीसुद्धा ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा मुलाखतींमधून यासंदर्भातील माहिती, टिप्स तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. अशातच आता तिने स्कीन केअर टिप्स दिल्या आहेत.
सध्या उन्हाळ्यामुळे सर्वत्र प्रचंड गर्मी वाढली आहे. यामुळे त्वचेचीसुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल माधवीने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी तिने काही घरगुती उपायसुद्धा सुचवले आहेत. माधवी नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
माधवीने दिल्या स्कीन केअर टिप्स
मुलाखतीत माधवीने मेकअपपूर्वी चांगलं सनस्क्रीन आणि मेकअपनंतर चांगलं मेकअप फिक्सर लावल्याने त्वचा आणि मेकअप चांलगा राहतो असं म्हटलं आहे. यावेळी तिने आठवड्यातून एकदा तरी आयसिंग करणं म्हणजे चेहऱ्याला बर्फ लावणं चांगलं असतं असंही सांगितलं आहे. यासह तिने एका फळापासून बनणाऱ्या रेसिपीची माहिती दिली आहे. जे आरोग्यासाठी आणि गर्मीत त्वचेसाठी खूप चांगलं असतं असं तिचं म्हणणं आहे.
माधवीने सांगितली खास रेसिपी
माधवी म्हणाली, “ताडगोळा(ice apple) आताच्या दिवसात खूप फायदेशीर आहे. ते तर खाल्लं पाहिजे. पण, ताडगोळा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो.” पुढे अभिनेत्री रेसिपी सांगत म्हणाली, “ताडगोळा कापायचा. बारीक तुकडे करायचे. कलिंगड आणि ड्रॅगन फ्रुटचेही बारीक तुकडे करायचे आणि त्यामध्ये नारळ पाणी टाकायचं. साखर वगैरे टाकायची नाही. हे सगळं एकत्रित करुन फ्रीजमध्ये ठेवायचं. दिवसातून दोन-तीनवेळा तुम्ही त्याचं सेवन करू शकता. कारण फळांपासून बनतं त्यामुळे चांगलं असतं.त्यात साखरही नसते. त्यामध्ये फक्त ताडगोळ्याचं प्रमाण जास्त पाहिजे. यामुळे बॉडी हायड्रेट होते. थंडावाही मिळतो.”
दरम्यान, माधवी अनेकदा तिच्या फिटनेस संदर्भातील योगा, व्यायाम करतानाचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. अनेकजण तिच्या अभिनयासह तिच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचंही कौतुक करत असतात.
