Madhavi Nimkar on Fitness and Skin Care: अभिनेत्री माधवी निमकर सध्या ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने तायडी ही भूमिका साकारली आहे. याआधी तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत साकारलेली शालिनी ही भूमिका चांगलीच गाजली होती.

माधवी निमकर जितकी तिच्या भूमिकेमुळे चर्चेत असते, तितकीच ती तिच्या फिटनेसमुळेदेखील चर्चेत असते. नुकतीच तिने सोनचाफा प्रोडक्शनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या डाएटबद्दल सांगितले.

“तुम्ही जे खाता ते तुमच्या…”

तिला विचारले की, फिटनेस आणि स्कीनसाठी काय टिप्स देशील? यावर माधवी म्हणाली, “मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जे खाता ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. कमीत कमी तेल वापरलेले पदार्थ खावेत. मी अजिबात असं म्हणणार नाही की साखर बंद करा. शरीरासाठी दोन चमचे साखर गरजेची असते, त्यामुळे तुम्ही ती खाल्लीच पाहिजे. फायबर, मिनरल जास्त असलेल्या गोष्टी, पोषक तत्त्वे जास्त असलेल्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. पॅकेट फूड किंवा ज्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात हे खाल्लं नाही पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही ते जितकं टाळाल, तितकं शरीरासाठी चांगलं आहे. तुम्हाला तुमचे शरीर जेव्हा महत्त्वाचे वाटते, तेव्हाच तुम्ही हे करू शकता. परमेश्वराने आपल्याला सगळ्यात जास्त काय चांगलं दिलं असेल तर ते आपलं शरीर आहे. ज्यावेळी तुमचा तुमच्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, त्या दिवशी तुम्ही शरीराची काळजी घ्यायला लागाल.”

पुढे ती म्हणाली, “मी अनेकजणांना बघते, ते प्राधान्यक्रमात सगळ्यात शेवटी शरीराला ठेवतात. पण, आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे, हे सगळ्यात वरती पाहिजे. पण, ते सगळ्यात खाली असतं. ती जागरूकता मी आणून देण्याचा प्रयत्न करते की सगळी मजा तुम्ही करा. पण, तुमच्या शरीराला कचराकुंडी समजू नका. रात्री उशीरा जेवलं जातं. मी असं म्हणेन की हॉटेलमधील रोज मागवू नका. पण, जरी तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही ते वेळेत खा. ११-१२ ही शरीराची आराम करण्याची वेळ आहे, तर त्यावेळी तुम्ही त्याला कामाला लावताय.”

स्कीनकेअरबद्दल माधवी काय म्हणाली?

स्कीनकेअरबद्दल माधवी म्हणाली, “माझा स्वत:चा विश्वास महागड्या प्रोडक्टसवर नाही. म्हणजे माझं हे सगळं वापरून झालं आहे. २०-२५ हजारांचे डे नाइट क्रीम मी वापरल्या आहेत. पण, तुमचं शरीर आतूनच स्वच्छ नसेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. क्लीन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर या गोष्टी तुम्ही रोज केल्या केल्या पाहिजेत. त्यामध्ये व्हिटॅमीन सी वापरू शकता. कारण रोज व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ आपण खातोच असे नाही. रोज एक उकडलेला आवळा किंवा मधात बुडवलेला आवळा खाल्ला पाहिजे. पण, ते सगळ्यांनाच जमतं असं नाही; तर व्हिटॅमिन सी सिरममधून जितकं तुमच्या त्वचेला देता येईल तितकं तुम्ही द्या. पुरेशी झोप घ्या, अशी काळजी घेतली तरी तुमची त्वचा चांगली राहील.”