Madhavi Nimkar : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई-बाबांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बालपणी आपले पालक आपल्याला सांभाळतात आणि त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांचा आधार होतो. अभिनेत्री माधवी निमकरने सुद्धा शूटिंगमधून वेळ काढून आई-बाबा आणि तिच्या लेकाला खास फिरायला नेलं होतं. निमकर कुटुंबीयांनी एकत्र सध्या चर्चेत असलेला ‘हनुमान अंश’ सिनेमा पाहिला. याचा खास व्हिडीओ माधवीने शेअर केला असून, नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

माधवी यादरम्यान मॉलमध्ये तिच्या आई-बाबांना घेऊन शॉपिंगला सुद्धा गेली होती. माधवी तिच्या बाबांना शूज घेऊन देत होती. त्यांना शूजची खरी किंमत सांगितली असती तर, त्यांनी ते घेतलेच नसते. म्हणूनच माधवीने हे शूज फक्त ३००-४०० रुपयांचे आहेत असं बाबांना सांगितलं. बापलेकीचं हे गोड नातं पाहून अभिनेत्रीचे चाहतेही खूश झाले आहेत.

माधवी म्हणते, “चला-चला आज निमकर कुटुंबीय चालले आहेत सिनेमा पाहायला. खरंच छान वाटतंय. कारण, माझे आई-बाबा खूप दिवसांनी बाहेर असे फिरायला बाहेर पडत आहेत. माझ्या घरी ते राहायला आलेत..त्यांनाही छान वाटतंय. आता मस्त मुव्ही बघणार, छान जेवणार आणि मग घरी जाणार. खरंतर सिनेमा पाच वाजताचा होता…पण, आम्ही चार वाजताच आलोय कारण, बाबांना चालायला वेळ जातो. त्यांना घेऊन मी खास शॉपिंगला सुद्धा जाणार आहे. ते शूज घेत आहेत…पण, आधी किंमत बघत आहेत. मी बाबांना त्या शूजची किंमत ३०० ते ४०० रुपये सांगितलीये. नाहीतर त्यांनी शूज घेतलेच नसते. कधी-कधी असं करावं लागतं कारण, त्यांना खरी किंमत समजली तर ते माझ्याबरोबर कधीच शॉपिंगला येणार नाहीत.”

माधवी निमकरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “हे किती गोड आहे”, “ताई तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतं..”, “असं गोड खोटं प्रत्येकाने बोलावं”, “खूप बरं वाटलं हा व्हिडीओ पाहून नि:स्वार्थ प्रेम”, “ताई अशीच सेवा करा आई-बाबांची… सुंदर व्हिडीओ”, “अभिनेत्री असून माधवी खरंच स्वभावाने खूप छान आहे”, “आजच्या दिवसातला सगळ्यात सुंदर व्हिडीओ” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.