Madhura Deshpande Talks About First Show : मधुरा देशपांडेने आतापर्यंत विविध मालिकांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तिची प्रत्येक मालिका लोकप्रिय ठरली आहे. पण, ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते ‘झी मराठी’वरील ‘कन्यादान’ या मालिकेमुळे. याच मालिकेतून तिला पहिला मोठा ब्रेक मिळाला. आजही लोक तिला यातील गायत्री या भूमिकेसाठी ओळखतात. त्यामध्ये शरद पोंक्षे यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारलेली. परंतु, तुम्हाला माहीत आहे का तिला ही मालिका कशी मिळालेली? चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
मधुरा देशपांडेनं या मालिकेबद्दल ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्यावेळी तिनं तिच्या आयुष्यातील एका कठीण प्रसंगाबद्दलही सांगितलं आहे. तिनं तिच्या आईच्या बिल्डिंगला आग लागल्यानं अपघात झाल्याचं म्हटलं आहे. मधुरा ‘कन्यादान’ मालिका तिला कशी मिळाली याबद्दल सांगताना म्हणाली, “पुण्यात आमच्या बिल्डिंगला आग लागली होती. त्याच्यामध्ये माझ्या आईला भाजलं होतं. ती आमच्या मदतनीसाला वाचवण्यासाठी गेली; पण तिथे असलेल्या धुरामुळे ती भाजली. तेव्हा मी आणि बाबा मुंबईत होतो. मी घर शोधत होते. कारण- आमचं ठरलेलं की, माझं बुलेट ट्रेनचं शूट झालं की, उद्या काही घरं पाहायला जाऊ.”
मधुराने सांगितला ‘तो’ प्रसंग
मधुरा पुढे म्हणाली, “मी घरी आले, तर बाबा नव्हते. आजी म्हणाली की, त्याला काहीतरी महत्त्वाचं काम आलंय आणि तो तिकडे गेलाय. मला वाटलं की, त्याच्याकडे चावी आहे का? जर तो गेला असेल तर. पण, सकाळी मला विचित्र वाटलं म्हणून मी थेट निघाले. तेवढ्यात मला त्यांचा फोन आला आणि म्हणाले की, घाबरू नकोस; पण आई होरपळून निघालीये. मला काही सुधरतच नव्हतं. मी आईला त्या अवस्थेत पाहिलं, तिला शस्त्रक्रियेसाठी नेत होते. तेवढ्यात मला सुहाससरांचा फोन आला की, तुला मुख्य भूमिका मिळाली आहे.”
मधुरानं यावेळी सांगितलं की, तिच्या आईनं तिला एका वर्षभराचा कालावधी दिलेला की, अभिनय क्षेत्रात काही करायचं असेल, तर ते या वर्षभरात तुला करावं लागेल. याबद्दल मधुरा पुढे म्हणाली, “तेव्हा वर्ष संपत आलेलं. नोव्हेंबर महिना सुरू होता. मी त्यांना सांगितलं की, माझ्या आईची परिस्थिती वेगळी आहे आणि मी ही मालिका नाही करू शकत.”
मधुरा पुढे म्हणाली, “त्यावर आई त्या अवस्थेत मला म्हणाली की, तू वेडी आहेस का, मला काहीच होणार नाहीये. माझ्या मुलीला इतकी मोठी संधी मिळतेय. तू नाही म्हणू शकत नाही. त्यानंतर मी शशांक सोळंकीसरांना सांगितलं, त्यावर ते म्हणाले की, ठीक, तू काळजी करू नकोस. आपण थांबू थोडे दिवस. मग आई बरी झाली आणि कन्यादानही सुरू झालं.”
