Kon Honar Crorepati Madhuri Dixit & Sharvari Wagh : माधुरी दीक्षित होस्ट करत असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा शो सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांत करोडपतीमध्ये अनेक स्टार कलाकारांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. सचिन पिळगांवकर, रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे, सोनाली बेंद्रे, शिव ठाकरे अशा अनेक कलाकारांनी करोडपतीच्या सेटवर माधुरीशी दिलखुलास गप्पा मारल्या. आता लवकरच या शोमध्ये महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात शर्वरी वाघ एन्ट्री घेणार आहे.

माधुरी आणि शर्वरी इंडो-वेस्टर्न लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. माधुरीने यावेळी काळ्या रंगाची गोल्डन किनार असलेली सुंदर साडी नेसली होती. तर, शर्वरीने ऑफ शोल्डर टॉप विथ लाँग स्कर्ट असा सुंदर लूक यावेळी केली हातो. रेड कार्पेटवर या दोघींनी एकत्र एन्ट्री घेत फोटोसाठी पोझ दिल्या.

आता अनेकांना प्रश्न पडला असेल शर्वरी वाघ करोडपतीच्या मंचावर का आली होती? तर यामागे कारण असं की, शर्वरी प्रमुख भूमिकेत असलेला ‘ये प्रेम मोल लिया’ हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

‘ये प्रेम मोल लिया’ या सिनेमाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं असून, त्यांच्या राजश्री प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. माधुरीने देखील राजश्रीची हिरोईन म्हणून एक काळ गाजवला होता. तिने सूरज बडजात्या यांच्या ‘हम आपके है कौन’मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. तर, आता राजश्रीची नवीन हिरोईन म्हणून शर्वरी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सूरज बडजात्या यांनी ‘हम आपके हैं कौन’ यासह ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

दरम्यान, आता माधुरी आणि शर्वरी एकत्र कोणकोणत्या विषयांवर गप्पा मारणार, करोडपतीच्या सेटवर आणखी कोणते किस्से उलगडले जाणार याचा खुलासा लवकरच होईल. प्रेक्षकही या एपिसोडसाठी उत्सुक आहेत.