Madhuri Dixit KBC : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची होस्ट असणार आहे. सोनी मराठी वाहिनीने नुकताच माधुरीच्या एन्ट्रीचा दमदार प्रोमो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. हिरवी पैठणी साडी, नथ, चंद्रकोर, गळ्यात पारंपरिक दागिने या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती. धकधक गर्लच्या साथीने आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे कारण ‘आता खेळ बदलणार’ आहे.

‘कोण होणार करोडपती’ या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर आता अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत. तिने गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता माधुरी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’ एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे. ज्ञानाची, जिद्दीची आणि स्वप्नांची परंपरा कायम असली तरी यंदा माधुरी दीक्षितच्या येण्यानं या मंचावर नवा दृष्टीकोन, नवी ऊर्जा आणि एक वेगळी उब अनुभवायला मिळणार आहे…

या नव्या प्रवासाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, “कोण होणार करोडपती’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होण्याची संधी मला मिळतेय… याचा मला विशेष आनंद आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ज्ञानाच्या बळावर सामान्य माणूस आपली असामान्य स्वप्नं कशी पूर्ण करू शकतो याचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. जिद्दीचा, चिकाटीचा आणि ‘एका संधीमुळे आयुष्य बदलू शकतं’ या विश्वासाचा हा कार्यक्रम आहे.

दरम्यान, ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षक लवकरच सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV वर पाहू शकतात.